‘समृद्धी’साठी हेक्टरी ६४ लाख !
By Admin | Published: June 18, 2017 12:45 AM2017-06-18T00:45:34+5:302017-06-18T00:47:19+5:30
जालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून खाजगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महामार्गासाठी जिल्ह्यात संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने कोरडवाहू, हंगामी बागायती व बागायती जमिनीचे दर निश्चित केले आहेत. त्यानुसार १७ गावांतील शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी २५ ते ६४ लाख रुपये मोबदला मिळणार आहेत.
जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधून ४२ किलोमीटरवरून समृद्धी महामार्ग जाणार असून, त्यासाठी ५१२.२८ हेक्टर जमिनींचे संपादन होणार आहे. पैकी ५०१.११ हेक्टर जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. लँड पुलिंग मॉडेलला होणारा विरोध पाहता शासनाने आता थेट वाटाघाटीद्वारे शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय मोबदला निश्चिती समितीने जमिनीच्या महसूल आकारणीनुसार चार वेगवेगळे भाग पाडले आहेत. जिरायती, हंगामी बागायती व बागायती जमिनीच्या पायाभूत दरांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या गावांमधील जमीन संपादित होणार आहे, तेथील तीन वर्षांतील जमीन खरेदी-विक्री व्यवहारांच्या सरासरी पाचपट दर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. समितीने ठरविलेल्या दरास संमती असणाऱ्या शेतकऱ्यांना विहित नमुन्यातील संमतीपत्र तलाठी, उपविभागीय अधिकारी किंवा संवादकांमार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या शिबीर कार्यालयात जमा करता येणार
आहेत.