महावितरणला ‘सौभाग्य’चे वावडे; घोषणा केली ६४ हजारांची; कनेक्शन दिले केवळ एक हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:53 AM2018-06-19T11:53:59+5:302018-06-19T12:00:08+5:30
आठ महिन्यांमध्ये महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाने निश्चित केलेल्या ६४ हजार ५३० कुटुंबांपैकी अवघ्या १ हजार कुटुंबांच्याच घरापर्यंत वीज पोहोचू शकली.
- विजय सरवदे
औरंगाबाद : गरिबांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य योजना’ आणली खरी; पण गेल्या आठ महिन्यांमध्ये महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळाने निश्चित केलेल्या ६४ हजार ५३० कुटुंबांपैकी अवघ्या १ हजार कुटुंबांच्याच घरापर्यंत वीज पोहोचू शकली. यामुळे गरिबांना वीज देण्याची महावितरणची घोषणा पोकळ ठरली आहे.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीज आणि दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली. तत्पूर्वी औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांमध्ये ज्यांच्या घरी अद्यापपर्यंतही वीज पोहोचलेली नाही, अशा दारिद्र्यरेषेखालील आणि रेषेवरील दोन्ही कुटुंबांचे सर्वेक्षण सहायक व शाखा अभियंत्यांमार्फत करण्यात आले. यामध्ये दारिद्र्य रेषेवरील गरीब कुटुंबांना ५०० रुपयांत वीज देण्याची ‘सौभाग्य योजना’ ही सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आली.
यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील १ हजार ४६१ कुटुंबांपैकी आतापर्यंत अवघ्या ७० कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात आले, तर दारिद्र्य रेषेवरील निश्चित करण्यात आलेल्या २६ हजार ७२८ कुटुंबांपैकी आतापर्यंत ६८० कुटुंबांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या दारिद्र्यरेषेखालील ९ हजार १०३ कुटुंबांपैकी आतापर्यंत २५० कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात महावितरणला यश आले आहे. या जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या दारिद्र्य रेषेवरील २७ हजार २३८ कुटुंबांपैकी एकालाही कनेक्शन देण्यात आलेले नाही.
योजनेसाठी वीज बिलाच्या थकबाकीमुळे ज्यांचा कायमचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, तात्पुरत्या शिबिरातील स्थलांतरित होऊ शकणारी कुटुंबे तसेच शेतवस्त्यांवरील घरे ही पात्र राहणार नाहीत. या योजनेच्या लाभार्थ्यांना वीज जोडणीच्या वेळी मीटरसोबत घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात येणार आहे. अतिदुर्गम भागात ज्याठिकाणी विजेचे कनेक्शन देणे शक्य नाही, अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांना अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी बल्ब आणि एक डीसी चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनांच्या घरांनासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत वीज जोडणी, तर दारिद्र्य रेषेवरील कुटुंबांना ५०० रुपयांमध्ये वीज जोडणी दिली जाणार आहे. या लाभार्थ्यांना ही रक्कम रोख स्वरुपात न भरता वीज बिलासोबत सलग दहा टप्प्यांमध्ये ती भरण्याची सवलत देण्यात आली आहे.
‘डेडलाईन’ आॅगस्ट २०१८
यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, आठ महिन्यांत कामामध्ये संथगती होती; पण यापुढे वीज कनेक्शन देण्यासाठी गती घेतली जाईल. कंत्राटदारांसोबत महावितरणचे कर्मचारीही वीज कनेक्शन देण्यासाठी जुंपले जातील. सप्टेंबर २०१७ मध्ये अंमलात आलेल्या या योजनेची ‘डेडलाईन’ ही आॅगस्ट २०१८ आहे.