सहा महिन्यांत ६४ हजार मतदार वाढले

By Admin | Published: September 13, 2014 11:41 PM2014-09-13T23:41:34+5:302014-09-13T23:53:13+5:30

नांदेड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर ६४ हजार मतदार वाढले असून १७ सप्टेंबरपर्यंत मतदरांना नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.

64 thousand voters have increased in six months | सहा महिन्यांत ६४ हजार मतदार वाढले

सहा महिन्यांत ६४ हजार मतदार वाढले

googlenewsNext

नांदेड : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर ६४ हजार मतदार वाढले असून १७ सप्टेंबरपर्यंत मतदरांना नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रपरिषद घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना २० सप्टेंबर रोजी निघणार असून त्याच दिवसांपासून उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. २७ सप्टेंबरपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जिल्ह्यात जवळपास २५ लाख मतदार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करतील. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापासून दहा दिवस अगोदरपर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार १७ सप्टेंबरपर्यंत मतदार नावनोंदणी करु शकतील. लोकसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या लक्षात घेतली असता आतापर्यंत ६४ हजार मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदारयादीतील एकही नाव वगळण्यात आले नाही.विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात उत्तर प्रदेशातून आलेल्या मतदानयंत्र वापरले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. नवरात्र महोत्सव मंडळांना सूचना निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत नवरात्र महोत्सव आणि बकरी ईद हे महत्वाचे सण येत आहेत. या महोत्सव कालावधीत मंडळाकडून राजकीय प्रचार होऊ नये यासाठी काळजी घ्यावी़
चोख पोलिस बंदोबस्त
सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी माहिती दिली. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून बाहेर जिल्ह्यातून फौजफाटा मिळण्याची शक्यता कमी असल्याने बंदोबस्तासाठी होमगार्ड, स्पेशल पोलिस आॅफिसर, सेवानिवृत्त अधिकारी, एनसीसीचे विद्यार्थी, वनविभागातील अधिकारी यांची मदत घेण्यात येईल. त्यासह राज्य राखीव पोलिस दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या प्रत्येकी तीन तुकड्या बंदोबस्तासाठी मिळणार आहेत. आंतर जिल्हा, आंतरराज्य सीमेवर फिक्स पाँईट निश्चित करण्यात आले असून यासाठी पोलिस, महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह व्हिडीओग्राफर उपस्थित राहणार आहेत. नऊ विधानसभा मतदारसंघात प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे ४१ गुन्हे दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी राजकीय पक्षांनी आवश्यक ती परवानगी घ्यावी. यासाठी प्रशासनाकडून एक खिडकी योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही चिखले म्हणाले.
मतदारांकडे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असले तरी मतदानयादीत नाव नसल्यास मतदारांना मतदान करता येणार नाही. त्यासाठी मतदारांनी आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, याची खात्री करुन घ्यावी. मतदारांसाठी ०२४६२-२४८२४८ या क्रमांकावर हेल्पलाईन सुविधा उपलब्ध राहील. लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रशासन मतदारांना व्होटरस्लिप देणार आहे. मतदानापूर्वी आठ दिवस अगोदर या स्लिप मतदारांपर्यत पोहोचतील. तक्रारीसंदर्भात ०२४६२-२४७२४७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: 64 thousand voters have increased in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.