६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६४ वर्षांच्या वृद्धाला सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:22 PM2019-04-22T23:22:09+5:302019-04-22T23:22:49+5:30
६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा ६४ वर्षांचा नातेवाईक गणी चाँद खान पठाण याला सोमवारी (दि.२२) सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे गुन्ह्यानंतर अवघ्या दीड वर्षांत आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
औरंगाबाद : ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा ६४ वर्षांचा नातेवाईक गणी चाँद खान पठाण याला सोमवारी (दि.२२) सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी १० वर्षे सश्रम कारावास आणि ६ हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे गुन्ह्यानंतर अवघ्या दीड वर्षांत आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या संदर्भात पीडित मुलीच्या आईने सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, १६ आॅक्टोबर २०१७ रोजी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी गणी चाँद त्यांच्या घरी आला. त्यावेळी मुलगी तिच्या वहिनीचा मोबाईल आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली होती. मोबाईलला रेंज नसल्याचे कारण देत गणी देखील वरच्या मजल्यावर गेला. बराच वेळ गणी तसेच मुलगी खाली आली नाही, म्हणून फिर्यादीची सून वरच्या मजल्यावर गेली असता, गणी तिच्यासोबत दुष्कृत्य करताना दिसून आला. फिर्यादीच्या सुनेला पाहून त्याने सारवासारव केली. सून मुलीला घेऊन खाली आली. गणीदेखील खाली आला. गणी निघून गेल्यानंतर सुनेने घडला प्रकार सासूला सांगितला. मात्र गणी नातेवाईक असल्याने बदनामी होईल, या हेतूने फिर्यादीने तक्रार दिली नव्हती.
दोन-तीन दिवसांनी मुलीला त्रास सुरू झाल्यावर तिला खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीला घाटी दवाखान्यात पाठविले. घाटीत ‘एमएलसी’ची नोंद होऊन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा वैद्यकीय अहवाल देण्यात आला. फिर्यादीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी ६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात फिर्यादी, पीडित मुलगी व सून आणि २ डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने गणी चाँद याला भादंविच्या कलम ३७६ (२) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.