मराठवाड्यातील ५११ गावांना ६४६ टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:55 AM2018-05-08T00:55:35+5:302018-05-08T00:58:02+5:30

मराठवाड्यातील सुमारे १० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ५११ गावांमध्ये ६४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

646 tankers in 511 villages of Marathwada | मराठवाड्यातील ५११ गावांना ६४६ टँकर

मराठवाड्यातील ५११ गावांना ६४६ टँकर

googlenewsNext
ठळक मुद्देटंचाई : मराठवाड्यातील १0 लाख ग्रामस्थ तहानलेले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील सुमारे १० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. ५११ गावांमध्ये ६४६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ५५६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या आठवड्यात ९० टँकर आणि ६० गावे टंचाईच्या रेट्याखाली आली आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ३७७ गावे, ४४ वाड्यांना ४५३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ४०६ विहिरी पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यातील अंदाजे ६ लाख ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१६ च्या एप्रिल अखेरीस ६०० टँकर औरंगाबादेत सुरू होते. त्यातून ९ लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात होते.
मे महिन्यात पारा ४२ डिग्री सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे, त्यामुळे विभागातील सुमारे ५११ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ही गावे टंचाईग्रस्त असल्यामुळे तेथे टँकरशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य नाही. टँकरशिवाय ग्रामस्थांना पाणीपुरवठ्याचा इतर कोणताही पर्याय नाही. टँकरच्या वेळा निश्चित नसल्यामुळे दिवसभर ग्रामस्थांना टँकर येण्याची वाट पाहावी लागते. नियमित पावसाळा जूनमध्ये सुरू झाला तरी जूनअखेरपर्यंत टँकरचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी यंदाचा उन्हाळा पहिल्यांदाच टँकरमुक्त चालला आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांत गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे सुमारे ३२ तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे.
मराठवाड्यातील
टँकर पाणीपुरवठा
जिल्हा गावे टँकर
औरंगाबाद ३७७ ४५३
जालना ५३ ६१
परभणी २० २६
हिंगोली १३ १२
नांदेड ४१ ८६
बीड ०६ ०७
लातूर ०१ ०१
उस्मानाबाद ०० ००
एकूण ५११ ६४६

Web Title: 646 tankers in 511 villages of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.