औरंगाबादेत नववर्षाच्या पहिल्या दिवशी ६५ बाळांचा जन्म; रात्री १२ वाजता तान्हुलीच्या आगमनाने आनंदोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 01:08 PM2023-01-02T13:08:26+5:302023-01-02T13:09:11+5:30
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नववर्ष आणि बाळाचे आगमन असा दुहेरी आनंदोत्सव
औरंगाबाद :नववर्षासोबत रविवारी अनेकांच्या घरात तान्हुली पावलं आली आणि अनेक जण आई-बाबा, आजी-आजोबा झाले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत शहरात ६५ बाळांचा जन्म झाला. विशेष म्हणजे मराठवाड्यातील आधारवड ठरणाऱ्या घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात रात्री १२ वाजता एका तान्हुलीचा जन्म झाला. कुटुंबीयांबरोबर घाटीतील डाॅक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांसाठी हा आनंददायी क्षण ठरला.
आई होणे हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वांत आनंददायी क्षण असतो. बाळाच्या आगमनाने संपूर्ण कुटुंबात आनंद पसरतो. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नववर्ष आणि बाळाचे आगमन असा दुहेरी आनंदोत्सव रविवारी अनेकांनी साजरा केला. शहरातील काही रुग्णालयांचा आढावा घेतला. तेव्हा सायंकाळी ७ वाजेपर्यंत ६५ बाळांचा जन्म झाल्याची माहिती देण्यात आली. रुग्णालयांची संख्या पाहता ही संख्या यापेक्षाही अधिकच आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दररोज म्हणजे २४ तासांत साधारण २१८ बाळांचा जन्म होतो. म्हणजे तासाला किमान नऊ शिशू जन्मतात. औरंगाबाद जिल्ह्यात घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासह शहरात महापालिकेची आरोग्य व्यवस्था आहे. विविध आजारांवर उपचार करण्याबरोबर प्रसूतीची सुविधा खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. या सर्व ठिकाणी महिन्याला सहा हजार ते सात हजार शिशूंचा जन्म होतो.
कुठे किती शिशूंचा जन्म?
घाटी रुग्णालयात ३८
घाटी रुग्णालयात रात्री १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ३८ शिशूंचा जन्म झाली. रात्री १२ वाजता एका मुलीचा जन्म झाल्याची माहिती स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.
मनपा रुग्णालयांत २
महापालिकेच्या सिल्कमिल येथील आणि एन-८ येथील रुग्णालयात प्रत्येकी एक, अशा दोन बाळांचा जन्म झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
‘सिव्हिल’मध्ये ५
जिल्हा सामान्य रुग्णालयात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५ बाळांचा जन्म झाला. यात ३ नैसर्गिक प्रसूती आणि २ सिझेरियन प्रसूती झाल्याची माहिती स्त्रीरोग विभागप्रमुख डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी दिली.
खासगी रुग्णालयांत २०, एक जुळे
शहरातील ८ खासगी रुग्णालयांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत १९ प्रसूती झाल्या. यात एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला. एकूण २० शिशूंचा जन्म झाल्याची माहिती औरंगाबाद स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डाॅ. अंजली वरे यांनी दिली.