हैदराबादच्या व्यापाऱ्याची ७५ टक्के नफ्याचे आमिष दाखवून ६५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:21 PM2019-06-25T13:21:50+5:302019-06-25T13:22:35+5:30
याविषयी एका महिलेसह तीन जणांविरोधात क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
औरंगाबाद : व्यवसायात ७५ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून हैदराबादेतील एका व्यापाऱ्याची तब्बल ६५ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले. याविषयी एका महिलेसह तीन जणांविरोधात क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
पांडुरंग कैलवाड (रा. परभणी), प्रकाश श्रीरंग जाधव आणि एका महिलेचा आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मनीष सुशीलचंद्र चौधरी हे हैदराबादमधील डोमाल गुंडा येथील रहिवासी आहेत. २०१३ पासून त्यांची आरोपींसोबत ओळख आहे. १६ मे २०१३ रोजी आरोपी त्यांना म्हणाले की, त्यांची श्री इक्वीपमेंट नावाची फर्म आहे. या फर्ममध्ये पैसे गुंतविल्यास मिळणाऱ्या नफ्यातील ७५ टक्के हिस्सा मिळेल. यानंतर त्यांच्यामध्ये नोंदणीकृत भागीदारीचा करार झाला. आरोपींवर विश्वास ठेवून चौधरी यांनी श्री इक्वीपमेंटच्या खात्यात दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल ६५ लाख रुपये गुंतविले.
ही रक्कम मिळाल्यानंतर चौधरी यांनी आरोपींकडे नफ्यातील त्यांचा हिस्सा मागितला. तेव्हा त्यांनी नोटाबंदीचे कारण पुढे केले. नंतर त्यांनी आज देतो, उद्या देतो, असे सांगून वेळ मारून नेली. एवढेच नव्हे तर त्यांनी चौधरी यांच्याशी संपर्क तोडला. त्यांचे फोन ते घेत नसत आणि त्यांना भेटतही नव्हते. आरोपींनी कट रचून आपल्याकडून ६५ लाख रुपये हाडपल्याचे चौधरी यांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात २३ जून रोजी तक्रार नोंदविली. उपनिरीक्षक संदीप शिंदे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.