छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११ वाळूपट्ट्यांतून ६५ हजार ब्रास वाळू मिळणार
By विकास राऊत | Published: January 18, 2024 06:26 PM2024-01-18T18:26:04+5:302024-01-18T18:26:27+5:30
वाळू खरेदीसाठी ग्राहकांना सेतू सुविधा केंद्रात २५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करावी लागेल.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यांतील एकूण ११ वाळूपट्ट्यांतून ६५,३२७ ब्रास वाळू उपलब्ध होणार असून, नागरिकांना आता स्वस्तात वाळू मिळेल. त्यांना सेतू केंद्रात नोंदणी करावी लागेल, असे खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांनी कळविले. १३ वाळूपट्ट्यांतील ६ डेपोंसाठी निविदा काढल्या होत्या. ज्यात फुलंब्री, पैठण व वैजापूर तालुक्यांतील ११ पैकी ४ वाळू वाळूपट्ट्यांसाठी निविदा आल्या होत्या.
फुलंब्री तालुक्यातील निमखेडा येथे गेवराई (गुंगी) येथे ६,०१३ ब्रास, पैठण तालुक्यात नांदर भाग १, भाग २, भाग ३, नवगाव भाग २ आणि ब्रह्मगाव येथील ब्रह्मगाव डेपोत सर्व घाट मिळून २३,५९२ ब्रास, सिल्लोड तालुक्यात धानोरा वाळूपट्ट्याच्या मोढा खु. डेपोवर ५,०८८ ब्रास, वैजापूर तालुक्यात पुरणगाव, भालगाव, अव्वलगाव, नागमठाण घाटावरील डाग पिंपळगाव डेपोवर ३०,६३४ ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे. नोंदणी झाल्यानंतर बुकिंग आयडीची पावती वाळू डेपोवरील मॅनेजरला देऊन वाहतूक पावती घ्यावी. डेपोपासून बांधकाम ठिकाणचा वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी नोंदणी केलेल्या व्यक्तीची राहील. वाळूची मागणी नोंदविल्यानंतर १५ दिवसांच्या आत डेपोमधून वाळू नेणे बंधनकारक असेल.
सेतू सुविधा केंद्रात करावी लागेल नोंदणी
वाळू खरेदीसाठी ग्राहकांना सेतू सुविधा केंद्रात २५ रुपये शुल्क देऊन नोंदणी करावी लागेल. रेशन कार्ड, आधार कार्ड, घरकुल प्रमाणपत्रासह मोबाइल क्रमांक लागेल. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत मिळेल. इतरांसाठी ६०० रुपये अधिक १० टक्के डीएमएफ ६० रुपये अधिक एसआय चार्ज १६ रुपये एकूण ६७७ रुपये लागतील. तसेच ५२ रुपये प्रतिब्रास किमतीने एका कुटुंबास एका वेळी कमाल १० ब्रास इतक्या मर्यादेत वाळू मिळेल. त्यानंतर वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या तारखेपासून एक महिन्यानंतर ग्राहकास वाळूची मागणी करता येईल.