वाळूज महानगरात ६५० बालकामगार सापडले, केंद्रीय सर्वेक्षणातून मिळाली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:27 PM2018-06-05T13:27:56+5:302018-06-05T13:29:29+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्थेतर्फे वाळूज महानगरात बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
वाळूज महानगर (औरंगाबाद ) : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बहुजन जाती-जमाती कामगार सेवाभावी संस्थेतर्फे वाळूज महानगरात बालकामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात तीनच दिवसांत तब्बल साडेसहाशे बालकामगार मिळून आल्याने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
केंद्रीय श्रम-रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांचा सर्व्हे केला जात आहे. या सर्वेक्षणासाठी प्रगणक, समन्वयक व स्थानिक सेवाभावी संस्थांचे पथक तयार करण्यात आले आहे. वाळूज महानगरातील हॉटेल, विविध कार्यालये व औद्योगिक क्षेत्रातील बालकामगारांचा शोध घेतला जात आहे. तीन दिवसांत केलेल्या सर्वेक्षणात वाळूज, पंढरपूर, विटावा, जोगेश्वरी, रांजणगाव, कमळापूर आदी भागांत तब्बल साडेसहाशे बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले. या मोहिमेत संजय मिसाळ, कुमार भोरे, अभिजित कुलकर्णी, धनंजय डोमाळे, मतीन शेख, एजाज खान, संतोष हिवराळे आदींचा समावेश आहे. ही मोहीम ७ जूनपर्यंत चालणार असून, त्यानंतर आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहेत.
वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्यांत व्यवस्थापनाकडून पैशांची बचत करण्यासाठी ठेकेदारामार्फत तोकड्या रोजंदारीवर बालकामगारांकडून काम करून घेतले जाते; मात्र या सर्वेक्षणामुळे बालकामगारांकडून काम करून घेणाऱ्या कंपन्या, कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांचे कारवाईच्या भीतीने धाबे दणाणले आहे.