स्मार्ट बसमधून १८ दिवसांत ६९ हजार नागरिकांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:37 PM2020-11-24T12:37:55+5:302020-11-24T12:40:42+5:30
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर ३० बसेस रस्त्यावर धावत आहेत.
औरंगाबाद : शहरबस ५ नोव्हेंबरपासून शहरातील रस्त्यांवर धावत आहे. १८ दिवसांत स्मार्ट बसने ९८ हजार ७६४ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. ६९ हजार ३५६ प्रवाशांनी या काळात प्रवास केला असून, १४ लाख २१ हजार रुपये तिकिटापोटी महसूल जमा झाला आहे. एका किलोमीटर मागे ६३ रुपये खर्च येत आहे तर उत्पन्न १८ रुपये आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर ३० बसेस रस्त्यावर धावत आहेत. प्रमुख नऊ मार्गांवर बससेवा सुरू करण्यात आली. शहराच्या हद्दीबाहेरील भागातही शहरबस सुरू करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानक ते फुलंब्री तसेच बिडकीन, करमाड, वेरूळ या मार्गावर बस धावत आहेत. तसेच अॅन्ड्रॉईड-ई-तिकीट मशीनव्दारे तिकीट घेण्याची सुविधा प्रवाशांना देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात आलेल्या शहरबसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या १८ दिवसांत स्मार्ट बसने ९८ हजार ७६४ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. ६९ हजार ३५६ प्रवाशांनी या काळात प्रवास केला असून, १४ लाख २१ हजार रुपये तिकिटापोटी महसूल जमा झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले. स्मार्ट सिटीला शहरबस सेवेपोटी मोठा तोटा सहन करावा लागत आहे. एका किलोमीटरमागे ४५ रुपयांची तूट सध्या निर्माण झाली आहे.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रयोग
शहर तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचविण्याबरोबरच स्मार्ट सिटी बस आता प्रासंगिक करारही करणार आहे. शहर आणि परिसरातील लग्नसमारंभ, खासगी, सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, यात्रा, मेळावे, सहल, प्रेक्षणीय तसेच औद्योगिक स्थळांना भेटी देण्यासाठी सिटी बस भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. प्रवाशांना ६० रुपयांत एक दिवस कुठेही प्रवास करता येईल. पाच दिवसांच्या प्रवास भाड्यांमध्ये सात दिवसांचा, २० दिवसांच्या प्रवास भाड्यांमध्ये ३० दिवसांचा तर ६० दिवसांच्या प्रवास भाडे पासवर ९० दिवसांचा प्रवास करता येणार आहे. बसच्या माहितीसाठी मोबाईल ॲप्लीकेशन, स्मार्ट कार्ड, ई-तिकीट मशीन, बस ट्रॅकिंग सुविधा, प्रवासी माहिती प्रणाली, प्रवाशांना थांबण्यासाठी स्मार्ट बसस्टॉप आदी सेवा विकसित केल्या आहेत.