लातुरात सहावे वारकरी साहित्य संमेलन
By Admin | Published: May 6, 2017 12:17 AM2017-05-06T00:17:19+5:302017-05-06T00:20:20+5:30
लातूर : वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे २७, २८ व २९ मे असे तीन दिवस सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे २७, २८ व २९ मे असे तीन दिवस सहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार असून, या संमेलनामध्ये शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडामुक्त विवाह आदी विषयांवर परिसंवाद आयोजित केले जाणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
विठ्ठल पाटील म्हणाले, मराठवाड्यात नांदेडनंतर लातुरात हे साहित्य संमेलन होत आहे. मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्येविरोधी जनजागृती व्हावी म्हणून संत साहित्य संमेलन लातुरात आयोजित करण्यात आले आहे. पाणी नियोजन, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या साहित्य संमेलनात होईल. २७ मे रोजी दिंडी स्पर्धा सोहळा आयोजित करण्यात आला असून, सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वीकारले असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. त्यामुळे खास शेतकऱ्यांसाठी हे संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, भोंदूगिरी थोपविण्यासाठी या साहित्य संमेलनामध्ये विचारमंथन होईल, असेही पाटील म्हणाले.