अंगणवाडी बांधकामासाठी ७ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 12:02 AM2016-03-17T00:02:05+5:302016-03-17T00:04:56+5:30
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला अंगणवाडी बांधकामासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला अंगणवाडी बांधकामासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मार्चएण्डपर्यंत तो प्राप्त होण्याची शक्यता असून विविध ठिकाणी जागांचा शोध घेण्यात येत आहे.
महिला व बालकल्याण विभागातर्फे ग्रामीण भागात ६ एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांमार्फत एकूण १0८९ अंगणवाड्या सुरू आहेत. त्यापैकी जागा नसल्यामुळे ६९ अंगणवाड्यांचे बांधकाम झाले नव्हते. तर असलेल्या अंगणवाड्यांपैकी अनेक बांधकामे जुनी असल्याने मोडकळीस आली आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठीही शासनाकडून निधी मिळत नाही. मात्र ६९ पैकी २५ ठिकाणच्या जागेचा प्रश्न सुटला असल्याने ही कामे नजीकच्या काळात करणे शक्य आहे. तर उर्वरित ४४ ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा शोधणे हा पर्याय वापरावा लागणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे यांनी केले आहे.
यामध्ये आखाडा बाळापूर -१२, वसमत १४, हिंगोली-५, कळमनुरी-२, सेनगाव-१, औंढा-२ अशी प्रकल्पनिहाय जागेची आवश्यकता असलेली ठिकाणे आहेत. यामध्ये कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर प्रकल्पांतर्गत वारंगा फाटा, जवळा त.ह., चिंचवडी, तोंडापूर तांडा, दत्तसावंगी, देववाडी वरुड, भुवनेश्वर, वरूड, वसमत प्रकल्पात एकरुखा, पारवा, कौडगाव, ब्राह्मणगाव बु., नागापूर, जवळा वसाहत, नहाद, कुडाळा, टेंभूर्णी, पांगरा सती, खंदारबन, हिंगोली प्रकल्पांतर्गत बासंबा, नर्सी, पहेनी, माळधामणी, कळमनुरी प्रकल्पांतर्गत बाभळी, जांभरुण, कारवाडी नांदापूर, खरवड, टाकळगव्हाण, चिंचोर्डी, मसोड, सेनगाव, गोरेगाव, साबरखेडा, हट्टा तांडा, गोरेगाव१, २,३,४,५, पळशी, भगवती जुनी, औंढा प्रकल्पांतर्गत गोळेगाव, शिरड शहापूर, दुधाळा, लक्ष्मणनाईक तांडा या गावांत अंगणवाड्यांसाठी जागेची गरज आहे. सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्यास चिमुकल्यांच्या विसाव्याची व्यवस्था होणार आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या या ज्ञानमंदिरांसाठी उदासीनता सोडून दानशूर मंडळींनीही पुढाकार घेतला तर हे अशक्य नाही. त्यासाठी संबंधितांनी निश्चित केलेले नाव अंगणवाडीला देण्याचीही तयारी आहे. अन्यथा यावेळीही निधी परत जाण्याची भीती आहे. प्रतिअंगणवाडी ६ लाख याप्रमाणे निधी असून यात किचनशेडचाही समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)