छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाला लागणार ७ हजार ४३० ईव्हीएम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:21 PM2024-11-18T13:21:57+5:302024-11-18T13:23:23+5:30
उमेदवारांच्या नावासह मतपत्रिका लावण्याची प्रक्रिया पूर्ण
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी ६ हजार १९९ बीयू (बॅलेट युनिट ) लागणार आहेत. २० टक्के आरक्षित यंत्रासह ७ हजार ४३० यंत्र प्रशासनाला तयार ठेवावी लागतील. ४ हजार २३९ व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेसाठी तयार असतील. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या अंतिम केल्या असून, जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या ३२ लाख २ हजार ६७ इतकी झाली आहे.
प्रशासनाने नऊ मतदारसंघांत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन सज्ज केल्या आहेत. त्यावर उमेदवारांचा क्रम, बॅलेट पेपर लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या १८ अभियंत्यांनी हे काम पूर्ण केल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपणार आहे. मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष यांना आतापर्यंत दोनवेळा प्रशिक्षण दिले आहे. जिल्ह्यात पुरेशा ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन याआधीच पुरविल्या आहेत. तिथे त्यांच्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली. त्या-त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव, त्यांचे चिन्ह, त्यांचा क्रम यानुसार ईव्हीएम मशीनच्या बॅलेट युनीट आणि कंट्रोल युनिटमध्ये सेटिंग करण्याचे आणि त्यावर बॅलेट पेपर चिकटविण्याचे काम झाले आहे.
आठ मतदारसंघात दोन बॅलेट युनिट
जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एका बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे बसतात. मात्र, वैजापूरचा अपवाद वगळता उर्वरित आठ ठिकाणी उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आठ मतदारसंघात मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर दोन-दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. कंट्रोल युनिट मात्र एकच लागेल. कन्नड मतदारसंघात १६ उमेदवार आहेत. त्यांची नावे एकाच मशीनवर बसतात. परंतु, निवडणुकीत नोटाचा पर्यायही असल्याने या मतदारसंघात केवळ नोटासाठी म्हणून दुसरे बॅलेट युनिट वापरावे लागणार आहे.
मतदारसंघनिहाय किती ईव्हीएम लागणार
सिल्लोड : ९७४
कन्नड : ८८३
फुलंब्री : ८९३
औरंगाबाद मध्य : ७६८
औरंगाबाद पश्चिम : ९६२
औरंगाबाद पूर्व : ७९२
पैठण : ८४२
गंगापूर : ८९३
वैजापूर : ४२३
एकूण : ७४३०