७ वर्षीय बालिकेवर परीचीताकडून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 07:46 PM2021-03-09T19:46:41+5:302021-03-09T19:47:05+5:30
पाेक्साे व इतर विविध कलमांखाली २० वर्षे सश्रम कारावास आणि एकूण ८९ हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : ७ वर्षांच्या बालिकेवर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार करणारा बंडू राेहिदास राठाेड याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चाैधरी यांनी साेमवारी पाेक्साे व इतर विविध कलमांखाली २० वर्षे सश्रम कारावास आणि एकूण ८९ हजार रुपये दंड ठोठावला.
दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे. बंडूने ३० जुलै २०१८ राेजी पीडितेला तिच्या आईला सांगून घरातून नेले हाेते. त्याने मारहाण करून अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. म्हशी चारणाऱ्याने घटनेची माहिती पाेलिसांना दिली. सहायक लाेकअभियोक्ता अजित अ्ंकुश व ज्ञानेश्वरी नागुला (डाेली) यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३६३ नुसार एक वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, ३६६ (ए) नुसार ३ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड, ३७६ नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार दंड, ३७६ (अ) नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, कलम ३७७ नुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड तसेच पाेक्साेच्या कलम ४ (२) नुसार २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, कलम ६ नुसार २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, ३२३ नुसार ३ महिने सक्तमजुरी आणि ५० रुपये दंड, कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार दंड आणि कलम १० नुसार ५ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तपास अधिकारी म्हणून उपनिरीक्षक आर. टी. भदरगे आणि पैरवी अधिकारी दिलीपकुमार परळीकर यांनी काम पाहिले.