७० दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘आलिम्को’ तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:26 AM2017-09-25T00:26:42+5:302017-09-25T00:26:42+5:30
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत २४ सप्टेेंबर रोजी ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची जबलपूर येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत आलिम्को मोजमाप तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत २४ सप्टेेंबर रोजी ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची जबलपूर येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत आलिम्को मोजमाप तपासणी करण्यात आली.
दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उप्रकम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने हिंगोली येथे रविवारी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांची आलिम्को मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील जवळपास ७० दिव्यांग विद्यार्थ्याचे मोजमाप घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. मोजमाप घेण्यात आलेल्या पात्र विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, कॅलिपर, कुबड्या तसेच कानातील यंत्र मोफत दिले जाणार आहे. २५ सप्टेंबर रोजी मोजमाप तपासणी शिबीर औंढा नागनाथ व वसमत येथे घेण्यात येणार आहे. हिंगोली येथे आयोजित शिबिरास उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, गट शिक्षणाधिकारी दत्ता नांदे, सुदाम गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मोजमाप तपासणी शिबिरात ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची तसेच पालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानकडून नियोजन करण्यात आले होते. शिबिरात तीन तालुक्यांतील दिव्यांग विद्यार्थ्यांना पालक घेऊन आले होते.