७० लाख लग्न अन् १३ लाख कोटी झाला खर्च, ८० टक्के रक्कम थेट बाजारात दाखल
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 15, 2023 11:30 AM2023-06-15T11:30:56+5:302023-06-15T11:31:10+5:30
एका लग्नात ४५० ते ४७५ लोकांना काम मिळाले
प्रशांत तेलवाडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: लगीन हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. धूमधडाक्यात लग्नसोहळे पार पडले. जानेवारी ते जूनदरम्यान पार पडलेल्या ४९ लग्नतिथींवर देशात ७० लाख लग्न लागली. त्यातून तब्बल १३ लाख कोटींची उलाढाल झाली असून, त्यातील ८० टक्के रक्कम ही बाजारपेठेत आली. व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॅन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
कॅट संघटनेचे महाराष्ट्रातील वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, यंदाच्या लग्न हंगामात १३ लाख कोटींची उलाढाल झाली. एका लग्नात मंगल कार्यालय, पत्रिका, कापड व्यापारी, केटरिंग, फोटोग्राफर, ट्रॅव्हल्स एजन्सीपासून ४५० ते ४७५ लोकांना काम मिळते.
२०% डेस्टिनेशन वेडिंग
७० लाख लग्नांपैकी ४० ते ५० टक्के लग्न हे ग्रामीण भागात झाले आहेत. २० टक्के हे डेस्टिनेशन वेडिंग होते. काही लग्न व्हिसा मिळाला नाही म्हणून वधू-वराने विदेशातच लावले, असे कॅटचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले.
कोणत्या महिन्यात किती लग्नतिथी
जानेवारीत ९,फेब्रुवारीत १३, मार्चमध्ये ६, मेमध्ये १३, जूनमध्ये ११ अशा एकूण ५२ लग्नतिथी होत्या. आता जूनमधील २३,२६ व २७ या मुख्य लग्नतिथी शिल्लक आहेत.
लग्नसंख्या - खर्च (प्रत्येकी)
- १० लाख ३ लाख
- १० लाख ५ लाख
- १५ लाख १० लाख
- १० लाख १५ लाख
- १० लाख २५ लाख
- १० लाख ३५ लाख
- ३ लाख ५० लाख
- २ लाख १ कोटी