सायबर लॅबमुळे ७० टक्के गुन्ह्यांचा उलगडा
By Admin | Published: January 1, 2017 11:40 PM2017-01-01T23:40:39+5:302017-01-01T23:47:42+5:30
लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे वर्षभरात ११५६ तक्रारी दाखल झाल्या
लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे वर्षभरात ११५६ तक्रारी दाखल झाल्या असून, यातील ७० टक्के गुन्ह्यांचा सायबर लॅबमुळे उलगडा झाला आहे. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासाचे काम अत्याधुनिक सायबर लॅबमुळे सुलभ झाले आहे. लॅबने दिलेल्या लोकेशनमुळे विविध पोलीस ठाणे, तपास अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी मदत झाली आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर क्राईम ब्रँचकडे अलिकडे मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीच्या घटनांचा तपास करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडून तक्रारी येत आहेत. दिवसेंदिवस या तक्रारींचा आकडा वाढत चालला आहे. जानेवारी ते ३० डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत या सायबर क्राईम ब्रँचकडे तब्बल ११५६ गुन्ह्यांतील आरोपींच्या लोकेशनसाठी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने सायबर क्राईम ब्रँचने ७० टक्के गुन्ह्यांतील लोकेशन शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खून, दरोडा, वाटमारी, घरफोडी आणि इतर गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर लॅबची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. एकूण ११५६ पैकी ७६५ गुन्ह्यांतील आरोपींचे लोकेशन सायबर लॅबने शोधले आहे. या लोकेशनच्या आधारावर गंभीर गुन्ह्यांतील आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आणि पथकाला यश आले नाही. (प्रतिनिधी)