‘आरटीओ’मध्ये ७० पैकी निरीक्षकांची ५८ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:53 PM2019-06-18T22:53:23+5:302019-06-18T22:53:45+5:30
आरटीओ कार्यालयात ३० मोटार वाहन निरीक्षक आणि ४० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७० पैकी केवळ १२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज विस्कळीत होत असून, अपघात विश्लेषण समितीच्या उद्देशालाही ‘खो’ बसत आहे.
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात ३० मोटार वाहन निरीक्षक आणि ४० सहायक मोटार वाहन निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात ७० पैकी केवळ १२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत. तब्बल ५८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज विस्कळीत होत असून, अपघात विश्लेषण समितीच्या उद्देशालाही ‘खो’ बसत आहे.
आरटीओ कार्यालयात सध्या ७ मोटार वाहन निरीक्षक आणि ५ सहायक मोटार वाहन निरीक्षक असे केवळ १२ अधिकारी आहेत. शिकाऊ वाहन परवाना, पक्का वाहन परवाना, वाहनांचे फिटनेस, नवीन वाहन नोंदणी, भरारी पथक, विविध शासकीय बैठका अशी विविध कामांची जबाबदारी मोठी कसरत करून त्यांना पार पाडावी लागत आहे. अपघातांवर उपाययोजना शोधण्यासाठी अपघात विश्लेषण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये आरटीओ निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता यांचा सामावेश आहे. या समितीने मृत्युमुखी अपघात स्थळाला भेट देऊन अपघातांची कारणे शोधून त्याचा अहवाल देणे अपेक्षित आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्याबरोबर अपघात होऊ नये, यासाठी उपाय सुचविण्याची जबाबदारी समितीवर आहे; परंतु सध्या आरटीओ कार्यालयात नियमित कामांनाही अधिकाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे अपघातांचे विश्लेषण कसे करावे, असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी, या समितीचे कामकाज सध्या ठप्प झाले आहे.