राज्यात ७० टक्के दूध भेसळयुक्त -खोतकर
By Admin | Published: January 3, 2017 12:03 AM2017-01-03T00:03:01+5:302017-01-03T00:06:35+5:30
जालना : राज्यात जवळपास ७० टक्के दूध भेसळयुक्त असून, यावर कारवाईचे व तपासणीचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाकडे आहेत.
जालना : राज्यात जवळपास ७० टक्के दूध भेसळयुक्त असून, यावर कारवाईचे व तपासणीचे अधिकार अन्न व औषधी प्रशासनाकडे आहेत. या विभागाकडे अगोदरच भरपूर व्याप असून, दूध तपासणीचे अधिकार पशुसंवर्धन विभागाकडे द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यास त्यांनी तत्वत: मान्यता दिल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात वस्त्रोद्योग व दुग्ध व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर राज्यमंत्री खोतकर यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले, रेशिम उत्पादनात जालना राज्यात आघाडीवर आहे. येथील रेशिम कोष बंगळूरु येथे विक्रीसाठी जातो. शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी जालन्यात रेशिम क्लस्टरसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रेशिम क्लस्टरसाठी ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यासाठी भूखंड निश्चित झाला असून, येत्या आठ दिवसांत इमारतीचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात केवळ दहा हजार लिटर दुध संकलन केले जाते. शेतीपूरक व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांना मदत होणार असल्याने गाय-गटशेळी पालन पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ५० टक्के अनुदान तत्त्वावर हा प्रकल्प असून, एक हजार ५०० प्रस्तावाचे नियोजन केले आहे. विनाविलंब प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना आपण बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आरेचा ए-२ प्लान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेनुसार जालन्याचे उच्च दर्जाचे दूध पुणे, मुंबईत विकले जाऊ शकणार आहे. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर म्हणाले.