७० हजार पाट्या गंजताहेत...
By Admin | Published: April 24, 2016 11:39 PM2016-04-24T23:39:32+5:302016-04-25T00:49:22+5:30
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक घराला क्रमांक असावा, त्यावर महापालिकेची एक लोखंडी पट्टी असावी, कोणालाही क्रमांकावरून घर सापडले पाहिजे, असे स्वप्न दहा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने बघितले होते.
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक घराला क्रमांक असावा, त्यावर महापालिकेची एक लोखंडी पट्टी असावी, कोणालाही क्रमांकावरून घर सापडले पाहिजे, असे स्वप्न दहा वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने बघितले होते. त्यादृष्टीने तयारीही करण्यात आली. ७० हजार मालमत्तांना घर क्रमांक देण्यासाठी लोखंडी पट्ट्याही तयार करण्यात आल्या. नेहमीप्रमाणे हे काम करणारी हैदराबाद येथील ‘स्पेक’ ही संस्था अर्ध्यावर काम सोडून निघून गेली. या संस्थेने तयार केलेल्या घराच्या पट्ट्या आजही मनपात पडून आहेत.
महानगरपालिकेत चांगली कल्याणकारी योजना कधीच यशस्वी होत नाही. कचऱ्यापासून खतनिर्मिती, शहर वाहतूक बस, शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचा ठेका घेणारी रॅमकी, मोफत अंत्यसंस्कार योजना, अशा कितीतरी योजना बंद पडल्या. २००६-०७ या आर्थिक वर्षात तत्कालीन आयुक्त असिमकुमार गुप्ता यांनी हैदराबाद येथील स्पेक या संस्थेला मनपात पाचारण केले होते. या संस्थेने शहरातील प्रत्येक मालमत्तेचा शोध घ्यावा. मालमत्ताकर लागलेला नसेल तर कर लावावा. कर नगर परिषदेच्या कालावधीतील असेल तर नवीन दराने लावावा म्हणून काम देण्यात आले होते.
स्पेक या संस्थेने कामही सुरू केले. दीड ते दोन वर्षांमध्ये स्पेक मालमत्ताधारकांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने कर लावत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला. शेवटी या संस्थेला मनपातून हाकलून लावण्यात आले. तत्पूर्वी या संस्थेला १ कोटी १८ लाख रुपये देण्यात आले होते. संस्थेने केलेल्या कामाचा एक रुपयाही फायदा मनपाला झाला नाही. आता दहा वर्षांनंतर परत मनपा खाजगी संस्थेमार्फतच मालमत्तांचा शोध घेणार आहे. दहा वर्षांपूर्वी स्पेकला १ लाख ४४ हजार मालमत्तांचा फेरआढावा घेण्याचे काम देण्यात आले होते. आज १ लाख ९० हजार मालमत्तांचा आढावा मनपाला घ्यावा लागणार आहे.
दहा वर्षांपूर्वी स्पेकला काम दिले तेव्हा प्रत्येक घरावर एक लोखंडी पट्टी लावावी, असे आदेश मनपाने दिले होते. काही मालमत्तांवर या पट्ट्या बसविण्यातही आल्या. या पट्टीवर घर क्रमांक, परिसर, मालमत्तेचे विवरण लिहिण्यात आले होते. मागील दहा वर्षांपासून या लोखंडी पट्ट्या आजही मनपाच्या इमारत क्रमांक ३ मधील तिसऱ्या मजल्यावर धूळखात पडल्या आहेत.
असा होता करार
एका नवीन मालमत्तेचा शोध लावल्यास स्पेक या संस्थेला १५३ रुपये देण्याचा करार मनपाने संस्थेसोबत केला होता.
संस्थेतर्फे शहरातील मालमत्तांवर लोखंडी पाट्याही लावण्याचे काम देण्यात आले होते.
संस्थेने ४० हजार पाट्या लावल्या. ७० हजार पाट्या पडून असल्याचा दावा मनपा करीत आहे.