औरंगाबादवर ७०० CCTV कॅमेऱ्याची नजर, चोरट्यांना मोठा धाक पण खबऱ्यांच्या पोटावर पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:40 PM2022-09-27T19:40:39+5:302022-09-27T19:41:18+5:30
'तिसऱ्या' डोळ्यामुळे गुन्हेगार, नियमबाह्य जमाव, विनानंबरच्या गाड्यांवर पोलिसांची कडक नजर
- राम शिनगारे
औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोठी मदत शहर पोलिसांना हाेत आहे. या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना माहिती काढण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या खबऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. त्याच वेळी सीसीटीव्हीमुळे चोरट्यांनाही मोठा धाक निर्माण झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर (सीसीसी) प्रकल्पाचे पोलीस आयुक्तालयात तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते १६ जानेवारी २०२१ उद्घाटन झाले. या सीसीसीमध्ये तीन शिफ्टमध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे, गोरख चव्हाण यांच्यासह २१ अंमलदार कार्य करतात. त्याशिवाय १५ ते २० तंत्रज्ञही काम करतात. चेन स्नॅचिंग, चंदन तस्कर, घरफोडी, अपघात, लूटमार, अपहरण, बॅग विसरलेली सापडून देणे, आंदोलन, मोर्चे, आक्षेपार्ह पोस्टर, व्हीव्हीआयपी बंदोबस्त, सभा, वाहतुकीच्या कोंडीसह इतर प्रकारचा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळोवेळी सीसीटीव्हीमध्ये टिपलेल्या घटनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचविण्याचे काम सीसीसी केंद्र करते.
मागील वर्षी गुन्ह्यातील दिलेले फुटेज
मागील वर्षी सीसीसी केंद्रातून विविध पोलीस ठाण्यातील तपासी अधिकाऱ्यांना फुटेज देण्यात आले. त्यामध्ये चोरी, दरोडा, खून, अपहरण, बलात्कार, जबरी चोरी, हाणामारीसह इतर प्रकारच्या ६२ गुन्ह्यांचा समावेश आहे. या दिलेल्या फुटेजचा समावेश दोषारोपपत्र दाखल करतानाही झालेला आहे.
उल्लेखनीय पाच घटना
- भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एलईडी अक्षरात लिहिलेल्या ‘थॅक्यू यू आंबेडकर’या अक्षराच्या बोर्डवरील ‘ए’ अक्षराचे नुकसान केल्यामुळे जमाव जमण्यास सुरुवात होत होती. सीसीसी केंद्रात हे दिसताच तत्काळ नियंत्रण कक्षाला कळविल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
- बेगमपुरा ठाण्यात १० वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होत असतानाच सीसीसी केंद्राला मुलीचे फोटो मिळाल्यानंतर सर्व कॅमेऱ्यांत मुलीचा शोध सुरू केला. मुलगी सिद्धार्थ गार्डन येथे दिसली. तिला तत्काळ ताब्यात घेतले.
- औरंगपुरा येथे एका महिलेला दुचाकीवर बसवून तिच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून घेतले. ही माहिती नियंत्रण कक्षाने सीसीसी केंद्राला दिल्यानंतर संशयित आरोपी सीसीटीव्हीत टिपला. त्यास त्रिमूर्ती चौकात धरण्यात आले.
- चंपा चौकात दोन व्यक्ती हातात तलवार घेऊन गाड्यांची तोडफोड करीत असल्याचे सीसीसी केंद्रातील कॅमेऱ्यात दिसल्यानंतर तत्काळ संबंधित ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
- १९ सप्टेंबर रोजी अडीच वाजता महिला पोलीस कर्मचाऱ्याची ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग एका रिक्षात विसरली. तेव्हा सीसीसी केंद्रातील कॅमेऱ्याच्या माध्यमातून अवघ्या दोन तासांत रिक्षाचा शोध घेऊन विसरलेली बॅग महिला कर्मचाऱ्यास मिळवून दिली.
इतरही कॅमेऱ्यांची मदत
कोणतीही घटना घडल्यानंतर पोलीस सीसीसी केंद्रातील कॅमेऱ्यांची मदत पहिल्यांदा घेतात. त्या कॅमेऱ्यात तपासणी केल्यानंतर इतर कॅमेऱ्यांची मदत घेतली जाते. यामध्ये विविध घरामध्ये लावलेले सीसीटीव्ही. दुकानांतील कॅमेऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश कार्यालये, हॉटेल, ढाब्यासह घरामध्ये कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्याचाही फायदा आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना होत आहे.
आमचा तिसरा डोळा सतर्क
शहरातील प्रत्येक घडमोडीवर पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवून आहेत. शहरातील कोणत्याही भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सीसीसी केंद्रातून त्याविषयीचे अलर्ट मिळतात. तसेच विविध गुन्ह्यांतील आरोपींना शोधण्यासाठी, गुन्हा उघड करण्यासही सीसीटीव्हीची मोठी मदत होत आहे. आमचा तिसरा डोळा कायम सतर्क असतो.
- डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त
एकूण कॅमेरे : ७००
परिमंडळ १ : ३१५
परिमंडळ २ : ३८५
‘सीसीसी’ची चालू वर्षातील कामगिरी
ट्राफिक जॅमची कारवाई : २७९
वेळेनंतर सुरू असलेले हॉटेल बंद करण्याच्या सूचना : २६
धरणे, मोर्चा, निदर्शने व व्हीआयपी बंदोबस्त : १६६
सण, उत्सवात बंदोबस्ताच्या सूचना : ३५
विनानंबर दुचाकीवरील कारवाईच्या सूचना : १४७