अँटिजनमध्ये ७०७ संशयित निगेटिव्ह, आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:03 AM2021-04-14T04:03:36+5:302021-04-14T04:03:36+5:30
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील १३ महिन्यांपासून शहरात अँटिजन, आरटीपीसीआर तपासण्या करण्यात येत आहेत. अँटिजन तपासणीचा निकाल १०० ...
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील १३ महिन्यांपासून शहरात अँटिजन, आरटीपीसीआर तपासण्या करण्यात येत आहेत. अँटिजन तपासणीचा निकाल १०० टक्के खरा नाही, असे यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मागील वर्षभरात केलेल्या अँटिजन तपासण्यांमध्ये ७०७ संशयित रुग्ण निगेटिव्ह आले, तर आरटीपीसीआर टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आढळले.
शहरात मार्च २०२०पासून कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर बाधितांच्या संपर्कातील प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. आयसीएमआरने या चाचणीला गोल्ड सॅन्डर्ड मानले आहे, पण नंतर तातडीने रिझल्ट देणाऱ्या रॅपिड अँटिजन चाचण्यांचा प्रकार समोर आला. आरटीपीसीआर चाचण्यांचा निकाल येण्यासाठी पूर्वी २४ तास लागत होते, तर आता १२ तासांत निकाल मिळतो. संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीने बाजूला करून त्यांच्यापासून होणारा संभाव्य धोका कमी करण्यासाठी अँटिजन चाचण्यांना प्राधान्य दिले जात आहे. आजही ५० टक्क्यांहून अधिक तपासण्या आरटीपीसीआर पद्धतीने होत आहेत. अँटिजन तपासणीत निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आरटीपीसीआर अहवालात तब्बल ७०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. मागील तेरा महिन्यांमधील ही आकडेवारी आहे.
-------
अँटिजन तपासण्या अधिक
महापालिकेने केलेल्या तपासण्यांमध्ये आरटीपीसीआरपेक्षा अँटिजन तपासण्यांचे प्रमाण जास्त आहे. महापालिकेने आत्तापर्यंत ६ लाख २५ हजार ६१३ चाचण्या केल्या आहेत. त्यातील ४ लाख ३४ हजार ८९४ जण निगेटिव्ह आले असून, ७१ हजार ९९७ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील निम्म्यापेक्षा जास्त तपासण्या अँटिजन पद्धतीच्या आहेत.
---------
आरटीपीसीआर १०० टक्के रिझल्ट
अँटिजन तपासण्यांमध्ये अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर चाचणीत ७०७जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे संशयितांनी अँटिजन तपासण्यांच्या भरवशावर न राहता १०० टक्के परिणामकारक असलेली आरटीपीसीआर चाचणीदेखील करून घ्यावी.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा