तंत्रनिकेतन महाविद्यालयात पहिल्या फेरीतच ७१ हजार जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:52 PM2019-07-17T23:52:40+5:302019-07-17T23:53:02+5:30
राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.
औरंगाबाद : राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्या यादीमध्ये अवघ्या ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामुळे तब्बल ७१ हजार ८१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ६५५ जागा उपलब्ध आहेत.
मागील ३ वर्षांपासून तंत्रनिकेतन महाविद्यालयांना घरघर लागली आहे. यावर्षी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आली. या फेरीतील प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील एकूण तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ५३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील ४३ हजार ७५४ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय बहाल केले आहे. त्यामुळे उपलब्ध जागेच्या ६२ टक्के जागा पहिल्या फेरीअखेर रिक्त राहिल्या आहेत. या फेरीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांत २० हजार २०६ जागा आहेत. यापैकी पहिल्या फेरीत १३ हजार ४४९ जागांवर विद्यार्थी अलॉट केले आहेत. यात ६ हजार ७५७ जागा रिक्त राहिल्या आहेत. अनुदानित तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये २ हजार ७८५ जागा असून, त्यात १ हजार ८३७ विद्यार्थी अलॉट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनुदानितमध्ये ९४८ जागा रिक्त आहेत. खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ९१ हजार ११२ जागा उपलब्ध आहेत. यापैकी अवघ्या २७ हजार ९८७ जागांवर विद्यार्थी दिले आहेत. खाजगी तंत्रनिकेतनमध्ये रिक्त जागांचा आकडा ६३ हजार १२५ एवढा असून, टक्केवारीमध्ये हा आकडा ६९.२८ टक्के आहे. पहिल्या गुणवत्ता फेरीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना १९ जुलैपर्यंत प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. उपलब्ध जागा आणि प्रवेश होणाऱ्या जागांमध्ये तब्बल ७० हजारपेक्षा अधिकची तफावत राहण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.