पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा
By बापू सोळुंके | Published: July 17, 2024 07:52 PM2024-07-17T19:52:54+5:302024-07-17T19:53:13+5:30
गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी मराठवाड्यातील नदी, नाल्यांना पूर आलेला नाही. परिणामी, या वर्षी मराठवाड्यातील बहुतेक सर्वच लहान-मोठ्या धरणांनी तळ गाठलेला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ४ टक्के जलसाठा उरला आहे, तर ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ४ धरणे कोरडी आहेत. मध्यम प्रकल्पांतही केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. राहिलेल्या ७३ दिवसांत हे प्रकल्प कसे भरतील, याची चिंता प्रशासन आणि शेतकऱ्यांना सतावत आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज असल्याने दीड महिन्यात मुसळधार पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर आलेला नाही. नद्यांना पूर न आल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात केवळ ८९ द.ल.घ.मी. अर्थात ४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर सिद्धेश्वर (हिंगोली), मांजरा आणि माजलगाव (बीड) तसेच सीना कोळेगाव (धाराशिव) हे प्रकल्प कोरडे आहेत. केवळ येलदरी प्रकल्पात २८ टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये ३० टक्के, निम्न तेरणा १६ टक्के तर निम्न मनार प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ओसंडून वाहणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात ४४ तर निम्न दुधना प्रकल्पात ४ टक्के पाणी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मराठवाड्यात जून ते ऑगस्टपर्यंतच मौसमी पाऊस पडतो. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस पडत असतो. यामुळे आता चांगल्या पावसाचे केवळ ७३ दिवस उरले आहेत. या कालावधीत मुसळधार पावसाची प्रकल्पांना प्रतीक्षा आहे.
मध्यम प्रकल्पाचीही दयनीय अवस्था
मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ आणि जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांमध्ये केवळ सरासरी ३ टक्के जलसाठा आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत ६, नांदेड जिल्ह्यातील ९ धरणांत १७ व परभणी जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ७ टक्के जलसाठा उरल्याचे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी सांगितले.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत अत्यल्प साठा
मध्यम प्रकल्पाच्या मागील दोन वर्षांतील एकूण प्रकल्पांच्या सरासरी जलसाठ्याच्या तुलनेत हा जलसाठा अत्यल्प आहे. २०२२ मध्ये मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पात सरासरी ३१ टक्के पाणीसाठा होता. तर गतवर्षी २०२३ मध्ये १७ टक्के होता. या वर्षी केवळ ८ टक्के आहे.