मराठवाड्यात अतिवृष्टीने ७४२ कोटी रुपयांचे नुकसान; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे शेतकऱ्यांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:55 AM2022-07-30T11:55:20+5:302022-07-30T11:55:20+5:30
यंदाच्या आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३८ हजार १२.४१ हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे
औरंगाबाद : मराठवाडा मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करीत आहे. यंदाही आजवरच्या पावसामुळे ७४२ कोटी रुपयांचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे. ३० व ३१ जुलै असे दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्याच्या राजधानीत आहेत. विभागीय आयुक्तालयात होणाऱ्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे विभागातील खरीप पीक नुकसानीसह बाधित झालेल्या पायाभूत सुविधांचा अहवाल सादर करणार आहेत. शेती नुकसानभरपाईसाठी ३०८.८ कोटी, बाधित पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी असा ७४२.४४ कोटींची मागणी केली जाणार आहे.
३१ जुलै रोजीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे विभागाला काय मदत करणार याकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या आजवरच्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे ६ लाख २७ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४ लाख ३८ हजार १२.४१ हेक्टरातील पिकाचे नुकसान झाले आहे, तर दीड हजार हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, मोबदल्यासाठी ३०८.८ कोटींचा निधी लागणार आहे, तर नांदेडमधील पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी ४३३.६४ कोटी लागेल, असा अहवाल रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या आढावा बैठकीत सादर केला जाणार आहे.
मराठवाड्यात मागील चार वर्षांपासून जास्तीच्या पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे वारंवार अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला फटका बसत आहे. यंदा तर जुलैमध्येच शेती पिकाचे नुकसान झाले आहे. केवळ ६ ते २४ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर या सहा जिल्ह्यांत खरीप पिकाला फटका बसला आहे. तीन वर्षांत ९ हजार ३१६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शासनाने विभागाला द्यावी लागली आहे.
तीन वर्षांत ९ हजार ३१६ कोटींची नुकसानभरपाई
वर्ष : २०१९
बाधित क्षेत्र : ४१ लाख ५३ हजार २२३.३० हेक्टर
शेतकरी संख्या : ४४ लाख ३३ हजार ५४९
दिलेली मदत : ३१००.६१ कोटी
वर्ष :२०२०
बाधित क्षेत्र : २५ लाख ४७ हजार ६४०.५३ हेक्टर
शेतकरी संख्या : ३६ लाख ७३ हजार ३४४
दिलेली मदत : २६३१.५९ कोटी
वर्ष : २०२१
बाधित क्षेत्र : ३६ लाख ५२ हजार ८७२.९५ हेक्टर
शेतकरी संख्या : ४४ लाख ४७ हजार १६१
दिलेली मदत : ३५८५.४२ कोटी