मराठवाड्यातील २९५८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:18 PM2018-10-03T23:18:32+5:302018-10-03T23:19:23+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाची पैसेवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी जाहीर केली आहे. त्यांनी शासनाच्या मदत व पुनर्वसन ...

75 58 villages in Marathwada cost less than 50 paise | मराठवाड्यातील २९५८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

मराठवाड्यातील २९५८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

googlenewsNext
ठळक मुद्देआणेवारी जाहीर : औरंगाबाद, जालना, बीडमधील २१ लाख हेक्टवरील खरीप हंगामाचे दिवाळे

औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाची पैसेवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी जाहीर केली आहे. त्यांनी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविलेल्या अहवालात ८ हजार ५३३ पैकी २९५८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. ५ हजार ५७५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. यंदा मराठवाड्यात फक्त ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील उत्पादकता निम्म्यावर आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील १३५५ पैकी १३३५ गावांतील खरीप हंगामाचे पावसाअभावी दिवाळे निघाले आहे. त्या गावांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. याचा अर्थ त्या गावांतील पिकांची उत्पादकता ५० टक्क्यांहून कमी होणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ९७१ पैकी ९५२ गावांतील खरीप हंगामाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. बीड जिल्ह्यातील १४०२ गावांपैकी ६७१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. ७३१ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे आयुक्तांनी शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. ३० सप्टेंबर रोजी पावसाळा संपतो. त्या धर्तीवर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून आयुक्तांनी खरीप हंगामाच्या परिस्थितीचा नजर आणेवारीचा अहवाल मागविला.
विभागात ५० लाख हेक्टरवर खरीप पेरणी
यंदाच्या खरीप हंगामात विभागामध्ये सुमारे ५० लाख हेक्टरवर पेरणी झाली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ६ लाख ९९ हजार हेक्टर, जालना जिल्ह्यात ६ लाख ३६ हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात ७ लाख ९८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. या तिन्ही जिल्ह्यांपैकी औरंगाबाद आणि जालन्यातील खरीप हंगाम पावसाअभावी १०० टक्के होरपळला आहे. २१ लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पावसाअभावी पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील १०७, वडवणी ४९, शिरूर कासार ९५, गेवराई १९२, माजलगाव १२१ तर परळी तालुक्यातील १०७ गावांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. जालना जिल्ह्यातील जालना तालुका १३२, बदनापूर ९२, भोकरदन १५७, जाफ्राबाद १०१, परतूर ९७, मंठा ११७, अंबड १३८, घनसावंगी तालुक्यातील ११८ गावांतील हंगाम पावसाअभावी संपला. तर औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ८४ गावे, कन्नड २०२, सिल्लोड १३२, खुलताबाद ७६, गंगापूर २२२, वैजापूर १६४, फुलंब्री ९१, पैठण १९१, औरंगाबाद तालुक्यातील १५३ गावे आणि अतिरिक्त ४० गावांतील हंगाम ५० पैशांपेक्षा खाली आला आहे.
४ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक
औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतील शेतकºयांनी खरीप हंगामासाठी अंदाजे ४ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक नांगरणी, पेरणी, मजुरी, बियाणे व खत खरेदीसाठी केली होती. सरासरी २१ लाख हेक्टरच्या तुलनेत हेक्टरी २० हजारांचा खर्च गृहीत धरला तरी ४ हजार कोटींहून अधिक केलेल्या गुंतवणुकीतून शेतकºयांना काहीही हाती लागणार नाही हे स्पष्ट आहे. आता सरकार काय मदत करणार त्याकडे लक्ष आहे.

Web Title: 75 58 villages in Marathwada cost less than 50 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.