४५ आरोग्य केंद्रांच्या दिमतीला ७५ डॉक्टर !

By Admin | Published: June 2, 2014 12:15 AM2014-06-02T00:15:17+5:302014-06-02T00:52:33+5:30

उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर सोमवारपासून बेमुदत संपावर जात आहेत.

75 doctors for 45 health centers | ४५ आरोग्य केंद्रांच्या दिमतीला ७५ डॉक्टर !

४५ आरोग्य केंद्रांच्या दिमतीला ७५ डॉक्टर !

googlenewsNext

उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर सोमवारपासून बेमुदत संपावर जात आहेत. जिल्हाभरातील तब्बल दीडशे डॉक्टर या संपात सहभागी होतील असा दावा मॅग्मो संघटनेने केला आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ७५ डॉक्टरांचे नियोजन केले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही, असा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. हाश्मी यांनी केला आहे. सर्व डॉक्टरांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ २००६ पासून देण्यात यावा, खात्यांतर्गत पदोन्नती करण्यासाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करावी, यासह आदी मागण्यांसाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संपावर जाणार आहेत. या संपामध्ये राज्यभरातील सुमारे १२ हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे सुमारे दीडशेवर वैद्यकीय अधिकारी संपात सहभागी होणार आहेत. सदरील मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाईल, असे मॅग्मो संघटनेकडून सांगण्यात आले. मॅग्मो संघटनेकडून प्रलंबित मागण्यांबाबत वारंवार चर्चा करण्यात आली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, असे संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दरम्यान, संप काळामध्ये रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेले ४० डॉक्टर, ‘आयुष’ चे १५, बंदपत्रीत १२ आणि अस्थाई ८ अशा ७५ डॉक्टरांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १ डॉक्टर कार्यरत ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. आर.आर. हाश्मी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई यांनाही पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या संपात रुग्णांची गैरसोय होणार नाही, असा दावा डॉ. हाश्मी यांनी केला आहे. (वार्ताहर) काय आहेत प्रमुख मागण्या..? सेवानिवृत्तीचे वय अन्य राज्याप्रमाणे ६२ करावे. वरिष्ठ अधिकार्‍यांनाही वेतनवाढीचा लाभ द्यावा. सर्व डॉक्टरांना २००६ पासून सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा. कामाचे तास निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल अंमलात आणावा. ७८९ बीएचएमएस व ३२ बीडीएस डॉक्टरांचा समावेश ब वर्गामध्ये करावा. खात्यांतर्गत पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता यादी तयार करावी. तीन महिन्यांपासून डॉक्टर वेतनाविना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याबाबतीत तातडीने तोडगा काढून वेतन अदा करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. २० जनूपर्यंत वेतन देणार मागील तीन महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ३१ मे रोजी डॉक्टर जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भेट घेण्यासाठी गेले असता ते तेथे उपस्थित नव्हते. त्यावर अतिरिक्त आरोग्य अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा केली. त्यावर २० जूनपर्यंत तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे, असे डॉ. फुलारी यांनी सांगितले. आरोग्य केंद्राला एक डॉक्टर जिल्हा परिषदेची ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन या प्रमाणे ९० डॉक्टर आवश्यक आहेत. प्रत्यक्षात ७५ डॉक्टरांचे नियोजन केले आहे. त्यामुळे ही संख्या कमी आहे. परिणामी रूग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. परंतु, त्याची शासनाने दखल घेतली नाही. डॉ. सचिन देशमुख.

Web Title: 75 doctors for 45 health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.