जिल्ह्यात ७५० कोटींच्या उलाढालीची ‘दिवाळी’

By Admin | Published: November 14, 2015 12:31 AM2015-11-14T00:31:30+5:302015-11-14T00:51:55+5:30

राजकुमार जोंधळे , लातूर दुष्काळ आणि मंदीची मरगळ झटकून आलेल्या दिवाळी सणानिमित्त विविध क्षेत्रांतील बाजारात तब्बल ७५० कोटी ४५ लाख रुपयांची उलाढाल झाली.

750 crore turnover of 'Diwali' in district | जिल्ह्यात ७५० कोटींच्या उलाढालीची ‘दिवाळी’

जिल्ह्यात ७५० कोटींच्या उलाढालीची ‘दिवाळी’

googlenewsNext


राजकुमार जोंधळे , लातूर
दुष्काळ आणि मंदीची मरगळ झटकून आलेल्या दिवाळी सणानिमित्त विविध क्षेत्रांतील बाजारात तब्बल ७५० कोटी ४५ लाख रुपयांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे वाहन, कपडे आणि सोन्या-चांदीच्या बाजारात समाधानकारक उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सर्वाधिक उलाढाल ही दुचाकी, चारचाकी वाहनांच्या बाजारात झाली असून, तब्बल ५०० कोटींची उलाढाल दसरा ते दिवाळी दरम्यान झाल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.
यंदाच्या दिवाळीत मंदीबरोबर दुष्काळाचे सावट होते. मात्र ही मंदी आणि दुष्काळाची मरगळ झटकत काही प्रमाणात बाजारपेठेत दिवाळीच्या तोंडावर गर्दी झाली. ही गर्दी ऐन दिवाळीच्या सणात मोठ्या प्रमाणावर वाढली. परिणामी, बाजारपेठेत वाहन बाजार, सराफा, कापड, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईलसारख्या महत्त्वपूर्ण बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली. शहरी भागात वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला असून, ग्रामीण भागात मात्र यंदा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोन्या-चांदीच्या बाजारात गरजेनुसार ग्राहकांनी दिवाळीच्या नरकचतुर्दशी आणि पाडव्यादिवशी दागिण्यांची खरेदी केली. या बाजारातील उलाढालीचा आकडा लातूर शहर आणि जिल्ह्यात ६० कोटींवर पोहोचला आहे.
भुसार लाईनमध्ये यंदाच्या दिवाळीने १० कोटींची उलाढाल झाली. तर उर्वरित जिल्ह्यात १० ते १२ कोटींची उलाढाल झाल्याचे किराणा होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. विशेषत: कपड्यांचा व्यापार ऐन दिवाळीत तेजीत असल्याचे द्वारकादास शामकुमार वस्त्र दालनाचे तुकाराम पाटील यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर कापड बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. मात्र ऐन दिवाळीत ग्राहकांचा टक्का वाढला आणि ही उलाढाल शहरासह जिल्ह्यात १० कोटींवर गेली. यात रेडिमेड आणि फॅन्सी साड्या खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. इलेक्ट्रॉनिक बाजारात कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब आदींची खरेदी मध्यमवर्गीय कुटुंबाकडून झाली. या बाजारात लातूर शहरासह जिल्हाभरात जवळपास ३५ लाख रुपयांच्या घरात उलाढाल झाल्याची माहिती संजोग कॉम्प्युटरचे मालक शामकुमार छगनलाल शिवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लातूर शहरातील जिल्हाभरात किमान पाचशे मोबाईल विक्रेत्यांची दुकाने आहेत. या मोबाईल विक्रेत्यांच्या दुकानात २५ विविध कंपन्यांचे स्मार्ट फोन विक्रीसाठी आहेत. मोबाईल अत्यावश्यक गरजेची आणि संवादाची वस्तू असल्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर स्मार्ट फोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. दिवाळीच्या सणासुदीत मोबाईल बाजार तेजीत असल्याचे दिसून आले. या मोबाईल बाजारात लातूर शहरासह जिल्ह्यात २० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती नंदी मोबाईलचे संचालक रविशंकर जळकोटे यांनी दिली.

Web Title: 750 crore turnover of 'Diwali' in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.