नूतनीकरणाअभावी ७५ हजार मजूर अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:55 PM2020-09-02T19:55:09+5:302020-09-02T19:56:38+5:30
एक लाखाच्या जवळपास मजुरांची नोंदणी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये अनेक मजुरांच्या हातचे काम गेले. अनेकांचा गावाकडे बस्तान हलविण्याचा प्रयत्न फसला. नूतनीकरण न केल्यामुळे शासनाच्या ५ हजार रुपयांच्या कोविड अनुदानापासून जवळपास ७५ हजार मजुरांना वंचित राहावे लागले.
लॉकडाऊनमध्ये मजुरांना मदतीसाठी विविध संस्था, संघटना सरसावल्या, पण त्यानंतर कोरोना रुग्ण वाढत गेल्याने घर कामगार महिलांना कामावरून घरीच अर्धपोटी राहावे लागले. शासनाकडून नोंदणीकृत मजुरांना पाच हजारांची कोविड मदत घोषित केली. त्यातील दोन हजारांचा टप्पा मोजक्याच मजुरांच्या खात्यावर जमा झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात तीन हजारांचे अनुदान येत आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मजुरांना सांगितले जात आहे.
एक लाखाच्या जवळपास मजुरांची नोंदणी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे आहे. त्यापैकी पंचवीस हजार कामगारांचेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे. इतर मजूर मात्र या योजनेपासून वंचित आहेत. त्या कामगारांची नोंदणी होणार की नाही याविषयी मजुरांत संभ्रम आहे. कारण मजूर नाक्यावर मजुराची अनलॉकनंतर हळूहळू गर्दी होऊ लागली आहे, परंतु त्यांच्या हाताला काम नाही, खोली भाडे देण्यासाठी पैसा नाही. शासनाने घोषित केलेल्या कोविड अनुदानातून मजुरांच्या खात्यात दुसरा टप्पा कधी येईल, याकडे मजुरांचे लक्ष लागले आहे.
नूतनीकरणाची अट रद्द करून निधी द्यावा
कोविड अनुदानापासून वंचित असणाऱ्या मजुरांचे रखडलेले नूतनीकरण आवश्यक करू नये. शासनाने दिलेले अनुदान हे मजुराच्या खात्यावर सरसकट पाठवावे. अनलॉकमध्ये नुकतेच जेमतेम काम मिळत आहे.
- मधुकर खिल्लारे (कामगार नेता)
मजुरांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती त्वरित द्यावी
नोंदणीकृत मजुरांच्या पाल्यांना विविध स्तरावर शिक्षणासाठी पुस्तक व साहित्य खरेदीसाठी मिळणारी शिष्यवृत्ती कोविडमध्ये रखडलेली आहे. जुन्याच नोंदणीकृत लाभार्थींच्या खात्यावर ती वर्ग होत असल्याचे सांगितले जाते, परंतु त्यापासून अनेक कामगारांचे पाल्ये वंचित आहेत.
- सुरेश वाकडे (कामगार नेता)
शासनाची मदत सुरू ...
लॉकडाऊनच्या काळात कोविड अनुदान शासनाने देणे सुरू केलेले आहे. जे वंचित असतील त्यांचीही नोंदणी करून घेत त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. वरिष्ठ त्यावर विचार करतील, शिष्यवृत्तीचे टप्पे असून, सध्या गतवर्षीचे वाटप होत आहे.
- श्रीहरी मुंढे (कामगार अधिकारी)