७६ कोटींच्या रस्त्यांच्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:16 AM2017-12-02T00:16:43+5:302017-12-02T00:16:50+5:30
जालना रोड आणि बीड बायपास या रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने तयार केलेला ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प आता रद्द होण्याचीच शक्यता आहे. कारण पुढच्या पाच वर्षांसाठी जालना रोड खड्डेमुक्त राहील, यासाठी १३ कोटी रुपयांतून काम करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जालना रोड आणि बीड बायपास या रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने तयार केलेला ७८९ कोटी रुपयांचा प्रकल्प आता रद्द होण्याचीच शक्यता आहे. कारण पुढच्या पाच वर्षांसाठी जालना रोड खड्डेमुक्त राहील, यासाठी १३ कोटी रुपयांतून काम करण्यात येणार आहे. महावीर चौक ते दिल्लीगेट या रस्त्यावर १० कोटी खर्च होणार असून, ८ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या ७६ कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निविदा शुक्रवारी काढण्यात आल्या. जानेवारी २०१८ पर्यंत हे काम सुरू होणार आहे.
दरम्यान बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पॅचवर्कच्या कामाचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील विविध रस्ते कामांसह वेरूळ येथील शहाजीराजे स्मारकाची पाहणी करून सौंदर्यीकरण आराखडा बनविण्याचे आदेश दिले.
दरम्यान यापुढे रस्त्यावर किमान १० वर्षे खड्डे पडणार नाहीत. सध्याचे खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ३८ हजार ५०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे. ही कामे सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांचे चित्र नक्कीच बदलेल. राज्याच्या ग्रामीण भागातील बरेच रस्ते हे रोजगार हमी योजनेत केले असल्याने त्याबाबत खात्री देणे शक्य नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात ९६ हजार कि़मी.पर्यंतचे पीडब्ल्यूडीचे रस्ते आहेत. त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, असा दावाही पाटील यांनी ८ नोव्हेंबर रोजी केला होता. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी १ डिसेंबर रोजी केला.