७६ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:27 AM2017-11-10T00:27:19+5:302017-11-10T00:27:21+5:30
केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयामार्फत शहरातील २१९ कि़मी.च्या रस्त्यांना निधी देण्यासाठी मंजुरी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुंबई कार्यालयामार्फत शहरातील २१९ कि़मी.च्या रस्त्यांना निधी देण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यांनी हा निधी दिल्यामुळे जालना रोड, बीड बायपासचे काम अधांतरी राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण महावीर चौक ते विमानतळ या रस्त्याचादेखील २१९ कि़मी.च्या प्रस्तावात समावेश आहे. दुधाची तहान ताकावर भागविण्याची वेळ यानिमित्ताने आली आहे.
हा निधी मिळावा, यासाठी गेल्या आठवड्यात गडकरी यांना एक प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील त्यांच्याकडे या प्रस्तावाबाबत चर्चा केली होती. त्यानुसार गडकरी यांनी ७६ कोटींतून करण्यात येणा-या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली असून, दोन दिवसांत मुंबई कार्यालयातील मुख्य अभियंता विनय देशपांडे त्यासाठी अधिसूचना काढतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हजारो कोटींच्या कामांच्या घोषणा केल्या त्याबाबत अजून काही निर्णय नाही. किमान ८० कोटींचा निधी तरी द्या, अशी मागणी स्थानिक पातळीवरील राज्यकर्त्यांनी गडकरींकडे पत्रांद्वारे केली होती. महिनाभरातच हा सगळा खेळ जमवून आणला आहे. हे रस्ते किमान पाच वर्षे टिकतील, असा दावा करण्यात येत आहे.
हे आहेत रस्ते...
विमानतळ ते महावीर चौक (जालना रोड), हर्सूल टी पॉइंट ते महावीर चौक, पैठण लिंक रोड ते गोलवाडी, ए. एस. क्लब ते लासूर स्टेशन ते वैजापूर, फुलंब्री ते खुलताबाद, वैजापूर ते नेवरगाव ते मांजरी २० कि़ मी., फर्दापूर ते अजिंठा लेणी ५ कि़मी., सिडको बसस्थानक ते वसंतराव नाईक चौक रस्ता रुंदीकरण, आवा मालेगाव रस्त्यासाठी हा निधी मंजूर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई एनएचएआय कार्यालयातील सूत्रांनी सांगितले, रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे; परंतु किती रस्ते व किती निधी याचे कुठलेही पत्र अजून आलेले नाही. ते आल्यानंतर अंमलबजावणी सुरू होईल.