७६ लाखांची फसवणूक प्रकरणात अकील अब्बास पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 04:38 PM2019-08-17T16:38:35+5:302019-08-17T16:40:15+5:30
व्यवसायात भागीदारी आणि नफा देण्याचे आमिष
औरंगाबाद : व्यवसायात २० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या महिलेची तब्बल ७६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने क्रांतीचौक येथील पेट्रोलपंपाचे मालक अकील फजल अब्बासला (रा. पाणचक्की परिसर) ताब्यात घेतले.
विटखेडा येथील रागिणी जयेश पटेल आणि आरोपी अकील यांचे अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये अकील हे रागिणी यांच्या घरी गेले. आपण कचऱ्याच्या गाड्यांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत असून त्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. या व्यवसायात पैसे गुंतविल्यास २० टक्के नफा देण्याचे आमिष त्याने दाखविले. यावेळी रागिनी यांनी पैशांवरून संबंध बिघडतात, त्यामुळे मी तुमच्या व्यवसायात पैसे गुंतविणार नाही, असे स्पष्ट बजावले. यानंतरही अकीलने पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून कमीत कमी ५१ लाख रुपये गुंतवा, मी तुम्हाला २० टक्के नफा देतो, असे सांगितले. अकीलवर विश्वास ठेवून रागिनी यांनी त्याला २६ लाख, १४ लाख आणि ११ लाख रुपयांचे तीन वेगवेगळे धनादेश दिले. हे धनादेश आरोपीने वटवून घेतले. यानंतर १९ जुलै २०१६ पर्यंत अकीलने रागिणी यांना मुद्दल रक्कम म्हणून चार लाख रुपये परत केले.
यानंतर रागिणी या त्याच्याकडे व्यवसायाचा हिशेब मागत होत्या; परंतु वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. अकीलने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच रागिणी यांनी २२ जून रोजी पोलीस आयुक्तांकडे अकीलविरोधात अर्ज दिला. याबाबत माहिती मिळताच अकीलने रागिणी यांना पन्नास हजार रुपये दिले.
सिटीचौक ठाण्यात गुन्हा४५० हजार रुपये दिल्यानंतर उर्वरित मुद्दल ४६ लाख ५० हजार रुपये आणि २० टक्के भागीदारीनुसार ३० लाख, अशी एकूण ७६ लाख ५० हजार रुपयांची मागणी महिलेने केली असता अकीलने त्यांना पैशासाठी भेटायचेही नाही, असे धमकावले. अकीलने विश्वासघात केल्याचे लक्षात येताच रागिनी यांनी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.