७६४ ग्राहक होणार सहआरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:47 AM2017-09-29T00:47:26+5:302017-09-29T00:47:26+5:30

येथील महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतून शहरातील ज्या ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली, त्या सर्व ग्राहकांनी जाणूनबुजून या गुन्ह्याला अप्रत्यक्षरित्या मदत केल्यावरुन पोलीस तपासात त्यांना सहआरोपी केले जाणार आहे.

764 Customers will cooperate | ७६४ ग्राहक होणार सहआरोपी

७६४ ग्राहक होणार सहआरोपी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतून शहरातील ज्या ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली, त्या सर्व ग्राहकांनी जाणूनबुजून या गुन्ह्याला अप्रत्यक्षरित्या मदत केल्यावरुन पोलीस तपासात त्यांना सहआरोपी केले जाणार आहे. या ७६४ ग्राहकांमध्ये शहरातील काही व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती व कर्मचाºयांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
परभणी येथील महावितरण कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश सटवाजी घोरपडे व महानगरपालिकेतील विद्युत विभागाचे सहायक अ़जावेद अ़ शकूर यांनी जानेवारी २०१५ ते आॅगस्ट २०१७ या कालावधीत महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतील ७१ लाख २९ हजार ६७ रुपये खाजगी ७६४ ग्राहकांच्या वीज बिलात जमा करुन अपहार केला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता ज्या ७६४ खाजगी ग्राहकांची वीज बिले आरोपींनी मनपाच्या पैशातून जमा केली, त्या ७६४ ग्राहकांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी अप्रत्यक्षरित्या या गुन्ह्यामध्ये मूकसंमती दर्शवत गुन्ह्याला पाठबळ दिले. त्यामुळे त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ७६४ ग्राहकांमध्ये शहरातील काही नामांकित व्यापारी, काही लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठीत नागरिक आणि कर्मचाºयांचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे या ७६४ ग्राहकांपर्यंत पोहचल्यास पोलिसांना गेल्या किती वर्षांपासून हा प्रकार सुरु आहे, या बाबतची माहिती उघड होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस कितपत गांभीर्याने करतात, यावर बरेच अवलंबून आहे.
धान्य घोटाळा प्रकरणात कोतवाली पोलिसांनी प्रारंभी अत्यंत गांभीर्याने तपास करुन ४ कोटी ९७ लाख रुपयांचा धान्य घोटाळा २८ कोटीपर्यंत गेल्याचे उघड केले होते. या गुन्ह्यात प्रारंभी आरोपींची संख्या २ असताना ती ३७ पर्यंत गेली होती. त्यानंतर या प्रकरणाचे न्यायालयात अत्यंत अभ्यासपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. कोतवाली पोलिसांकडून जसा तपास वरिष्ठ अधिकाºयांकडे गेला, तसा तो थंडावला. आता तर हा तपास ठप्प झाला आहे. धान्य घोटाळ्यातील आरोपी पोलिसांसोबत बसून गप्पा मारत आहेत. परंतु, त्यांना अटक करण्याची तसदी पोलीस घेत नाहीत. यामागचे गुपित वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्या आरोपींनाच जास्त अवगत आहे. याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी महापालिकेच्या पैशाच्या अपहार प्रकरणाचा तपास केल्यास फुकटच्या पैशावर डल्ला मारुन पांढरे कपडे घालणाºयांचे पितळ उघडे पडणार आहे. हे प्रकरण राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याने पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता आहे.
आता या दबावाला झुगारुन पोलीस चोखपणे तपास करणार की धान्य घोटाळ्याप्रमाणे आरोपींचे आदरतिथ्य करण्यात पोलीस मग्न राहणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: 764 Customers will cooperate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.