प्रभागरचनेवर ७९ आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:14 AM2017-07-20T00:14:31+5:302017-07-20T00:18:09+5:30
नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या प्रभागरचनेवर ७९ आक्षेप प्राप्त झाले असून यात बुधवारी शेवटच्या दिवशी ३५ आक्षेप मुख्यालयात प्राप्त झाले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या प्रभागरचनेवर ७९ आक्षेप प्राप्त झाले असून यात बुधवारी शेवटच्या दिवशी ३५ आक्षेप मुख्यालयात प्राप्त झाले आहेत़
महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ नगरसेवकांसाठी ६ जुलै रोजी पहिली आरक्षण सोडत तसेच प्रभागरचना घोषित करण्यात आली़ या प्रभागरचनेत फेरबदल करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानेच दिल्याने १० जुलै रोजी फेरआरक्षण सोडत काढण्यात आली़
या फेरसोडतीनंतर महापालिकेने ११ जुलैपासून प्रभागरचना आणि आरक्षणबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिका मुख्यालयातील कार्यालयात हरकती व सूचना मागवल्या होत्या़ या हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख १९ जुलै होती़ १८ जुलैपर्यंत ४४ आक्षेप प्राप्त झाले होते़ बुधवारी शेवटच्या दिवशी महापालिकेच्या मुख्यालयातच ३५ आक्षेप दाखल झाले आहेत़
प्राप्त आक्षेपांमध्ये प्रभाग निर्मितीत भाग तोडताना आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आहेत़ महापालिकेच्या प्रभाग १४ ते प्रभाग १७ बाबतच आक्षेप दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले़ या सर्व आक्षेप व सूचनांची सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे़ या सुनावणीनंतर प्रभागरचना व आरक्षणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे़ आता इच्छुकांचे लक्ष सुनावणीकडे लागले आहे़