सार्वजनिक बांधकाम विभागाचा शहरातील ९ रस्त्यांसाठी ७९ कोटीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 03:00 PM2017-11-08T15:00:43+5:302017-11-08T15:02:59+5:30
सार्वजनिक बांधकाम विभाग शहरातील ९ रस्त्यांसाठी ७९ कोटी रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ठेवणार आहे.
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभाग शहरातील ९ रस्त्यांसाठी ७९ कोटी रुपयांची मागणी करणारे प्रस्ताव बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर ठेवणार आहे. त्यामध्ये सिडको बसस्थानक येथील ट्रँगल रुंदीकरणासह ९ महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश आहे.
बुधवारी दुपारी बांधकाममंत्री शहरात येत आहेत. दुपारनंतर ते मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार यांच्या दालनात खड्डेमुक्त अभियान, इमारती व रस्त्यांची प्रलंबित कामे व इतर कामांचा आढावा घेणार आहेत. बैठकीला कनिष्ठ अभियंत्यांपर्यंत सर्वांना बोलावण्यात आले आहे.
सूत्रांनी सांगितले, पाच ते सहा महत्त्वाच्या रस्त्यांना मंजुरी मिळावी, असा प्रयत्न आहे. विमानतळ ते नगरनाका, हर्सूल टी-पॉइंट ते महानुभव आश्रम, पैठण लिंक रोड, ए.एस. क्लब ते शिर्डी, नगरनाका ते शरणापूर, फुलंब्री ते खुलताबाद, वैजापूर ते नेवरगाव ते मांजरी २० कि़मी., अजिंठा ते अजिंठा लेणी ५ कि़मी, सिडको बसस्थानक ते वसंतराव नाईक चौक रस्ता रुंदीकरणासाठी तातडीचे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत. शिवाय जालना ते अंबडमार्गे वडीगोद्री या रस्त्याच्या कामासाठीही निधी मागण्यात येणार आहे. सर्व मिळून ७९ कोटी रुपयांचा तातडीचा निधी बांधकाम विभागाला मिळावा, यासाठी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी प्रस्ताव तयार केल्याचे सूत्रांनी सांगितले.
६४ कोटी लागणार खड्डे बुजविण्यासाठी
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांसाठी खड्डे बुजविण्यासाठी ६४ कोटी लागणार आहेत. औरंगाबादेत ११४ कामांतील १,९९४ कि़मी. रस्त्यांना ४३ कोटी, तर जालन्यातील ५७ कामांतील ६८७ कि़मी. रस्त्यांना साडेएकवीस कोटी रुपये लागणार आहेत. दोन्ही मिळून १७१ कामे असून, ३ हजार ८१ कि़मी. रस्त्यांचा त्यात समावेश आहे. पूर्ण विभागाचा आढावा घेतल्यानंतर बांधकाममंत्री विभागासाठी काय देणार याची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.