विधानसभेच्या रणधुमाळीस ७९ दिवस ?
By Admin | Published: June 13, 2014 12:07 AM2014-06-13T00:07:13+5:302014-06-13T00:38:54+5:30
हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.
हिंगोली : राज्याच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जेमतेम ७९ दिवसांचा कालावधी राहिला असून निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे.
राज्याच्या दहाव्या विधानसभेचा कार्यकाळ १७ आॅक्टोबर १९९९ रोजी संपला होता. त्यानंतर अकराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २००४ रोजी संपला. त्यानंतर आता चालू असलेल्या बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ ३० आॅक्टोबर २०१४ रोजी संपणार आहे. तत्पुर्वी तेरावी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. २००९ मध्ये विधानसभा निवडणूकीची घोषणा ३१ आॅगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर लागलीच आचारसंहिता लागू झाली. १८ सप्टेंंबर २००९ रोजी या निवडणूकीची अधिसुचना जारी झाली होती. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी राज्यातील ८२ हजार २८ मतदार केंद्रांवर मतदान झाले होते. तर २२ आॅक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. मागील विधानसभेचा कार्यकाळ लक्षात घेता यावेळी ३१ आॅगस्ट पुर्वी किंवा १ ते २ सप्टेंबर या कालावधीत तेराव्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक विभागाने त्या दृष्टीकोणातून तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ९ जून रोजी १ जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवरील दावे व हरकती ९ ते ३० जून दरम्यान स्विकारण्यात येणार आहे. तसेच आलेल्या दावे व हरकतीची प्रकरणे १५ जुलै पर्यंत निकाली काढण्यात येणार असून २५ जुलै रोजी परिपुर्ण मतदार यादीचे अद्यावतीकरण केले जाणार आहे. ३१ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
राजकीय नेते मंडळींना ६८ दिवसांचा वेळ
विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी राजकीय नेते मंडळींना अंदाजे ६८ दिवसांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. लागलीच आचारसंहिता लागू होईल. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २५ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर साधारणपणे ३१ आॅगस्टपर्यंत नेते मंडळींना तयारीसाठी वेळ मिळणार आहे. या कालावधीत बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. काही राजकीय नेते मंडळींनी आतापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
तीन मतदारसंघात ८ लाख १४ हजार मतदार
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत ८ लाख १४ हजार २९३ मतदार आहेत. त्यामध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात २ लाख ५८ हजार ५१६, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ३६० आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ४१७ मतदार आहेत. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमामुळे या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
२००९ मध्ये ३१ आॅगस्ट रोजी झाली होती निवडणुकीची घोषणा
१३ आॅक्टोबर २००९ रोजी मतदान झाल्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी झाली होती मतमोजणी
यावेळेसही ३१ आॅगस्टपुर्वी किंवा त्याच्या एक- दोन दिवसानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता.