साध्या कुलपाच्या भरवशावर ठेवले ७९ तोळे सोने, ११ लाख रुपये! स्पोर्ट्स बाइकवरून चोरटे पसार

By सुमित डोळे | Published: July 3, 2024 11:24 AM2024-07-03T11:24:55+5:302024-07-03T11:29:51+5:30

हनुमाननगरमध्ये तिघांकडून घरफोडी;लाखोंचा ऐवज चोरून चोरटे महागड्या स्पोर्ट्स बाइकवरून पसार

79 tola gold, 11 lakh rupees kept in the house on the trust of a simple lock! | साध्या कुलपाच्या भरवशावर ठेवले ७९ तोळे सोने, ११ लाख रुपये! स्पोर्ट्स बाइकवरून चोरटे पसार

साध्या कुलपाच्या भरवशावर ठेवले ७९ तोळे सोने, ११ लाख रुपये! स्पोर्ट्स बाइकवरून चोरटे पसार

छत्रपती संभाजीनगर : हनुमाननगरच्या गल्ली क्रमांक २ मध्ये चोरांनी एका मंडप व्यावसायिकाचे घर फोडून तब्बल ७९ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ११ लाख ८ हजार रोख रक्कम लंपास केली. सीसीटीव्ही फूटेजनुसार सोमवारी मध्यरात्री १:१५ ते २:१५ दरम्यान तीन चोरांनी मिळून ही चोरी केली. विशेष म्हणजे, चोरांनी शेजारच्या घरासमोरील पत्र्यावरून घरात प्रवेश केला. लाखोंचा ऐवज हाती लागल्यानंतरही चोरांना बेडरूममधील टी.व्ही.चादेखील मोह आवरला नाही. केवळ एक कोंडा तोडून चोरांनी एवढा मोठा हात मारला.

मंडप व्यावसायिक अमित मनोहर शिंदे हे त्यांचा लहान भाऊ, आई, पत्नीसह हनुमाननगरच्या गल्ली क्रमांक २ मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. २२ जून रोजी ते सहकुटुंब बाहेरगावी गेले. शासकीय सेवेत असलेली त्यांची बहीण शनिवार, रविवार असल्याने शहरात येते. त्यामुळे त्यांनी घराची चावी मित्राकडे ठेवली होती. ३० जून रोजी बहीण नागपूरला गेली. २ जुलै रोजी भाडेकरू वर झाडांना पाणी टाकण्यासाठी गेले असता मुख्य दरवाजाचा कोंडाच तुटलेला आढळला. हे कळताच अमित यांचे काका अशोक शिंदे यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजित पाटील, पुंडलिकनगरचे निरीक्षक राजेश यादव, उपनिरीक्षक रेशीम कोळेकर, सहायक फौजदार सुनील म्हस्के यांनी धाव घेतली.

लॅच लॉकच्या आट्याच उखडून काढल्या
शिंदे यांच्या शेजारच्या घरासमोर पत्र्याचे शेड आहे. त्या शेडवरून दोघांनी रात्री १:१५ वाजता पहिल्या मजल्यावर उडी मारून प्रवेश केला. अगदी सहज कडी-कोंडा तोडून मुख्य घरात प्रवेश केला. तिसऱ्या मजल्यावरील खोलीला लॅच लॉक होते. चोरांनी मात्र लॅचलॉकच्या आट्या असलेला भाग चौकटीपासून उखडून टाकल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले.

तीन लॅपटॉप सोडले; टी.व्ही. मात्र नेला
चोरांनी ७९ तोळे सोने, ११ लाख १८ हजार रोख सोबत घेतली. पण, तीन लॅपटॉप तसेच सोडले. मात्र, जाताना तिसऱ्या मजल्यावरील बेडरूममधील टी.व्ही. नेला. २:१५ वाजेच्या सुमारास त्यांचा तिसरा साथीदार घराखाली महागड्या स्पोर्ट्स बाइक घेऊन आला. त्यावर ३२ इंची टी.व्ही. घेऊन ट्रिपल सीट गेले. जाताना तळमजल्यावरील चॅनल गेटपर्यंत पुन्हा वर गेले. पोलिसांचे श्वानपथक तेथे जाऊन पुन्हा वर गेल्याने चोरांनी तेथून जाण्याचा प्रयत्न रद्द करून शेडवरूनच परत जाण्याचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज आहे.

ऐवज ज्या खोलीत, त्याच खोलीत प्रवेश
- चोरांनी केवळ मौल्यवान ऐवज असलेल्या खोल्यांनाच लक्ष्य केले. ऐवज नसलेल्या खोलीत त्यांनी प्रवेशही केला नाही.
- शिंदे यांच्या घराला कुलूप असल्याचे रस्त्यावरून दिसत नाही.
- शिंदे यांनी दूधवाल्याला गावाला जात असल्याचे सांगितले होते. वृत्तपत्रे मात्र खिडकीत लटकलेली होती.
- चोर जाताना तळमजल्यावरील चॅनलगेटपर्यंत गेले. तेथील कुलूप तोडतानाच्या आवाजाच्या शक्यतेने चोर आल्यामार्गे शेडवरूनच परत गेले असावेत. श्वान दोन वेळा त्याच मार्गे येऊन गेल्याने पोलिसांनी हा निष्कर्ष काढला.

पहिल्या मजल्यावरून गेलेला ऐवज
- १७ तोळे वजनाचे दोन हार, प्रत्येकी ३.५ तोळ्यांचे दोन नेकलेस, १.५ तोळ्याच्या दोन अंगठ्या, ४.५ तोळ्याचे १५ सोन्याचे तुकडे, ५ तोळ्यांचे गंठण, ६ ग्रॅमची एक अंगठी, ५०० - २०० रुपयांची चांदीची प्रत्येकी एक नोट, चांदीची १६ नाणी, १ चांदीची चावी व १ लाख ५० हजार रोख रक्कम.

दुसऱ्या मजल्यावरून गेलेला ऐवज
३ तोळे वजनाचे ब्रेसलेट, प्रत्येकी २.५ तोळ्याच्या २ अंगठ्या, १ तोळ्याची एक अंगठी, प्रत्येकी ५ तोळ्याचे दोन ब्रेसलेट, ५ तोळ्याच्या २ सोनसाखळ्या, ७.५ तोळ्याचे गंठण, १ तोळ्याची कर्णफुले, ४.५ तोळ्याची सोनसाखळी, ३ तोळ्याचे १० सोन्याचे शिक्के, ९ लाख ६८ हजार रोख रक्कम.

Web Title: 79 tola gold, 11 lakh rupees kept in the house on the trust of a simple lock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.