उद्या मतदाना दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या, १४ आठवडी बाजार बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 07:44 PM2024-11-19T19:44:47+5:302024-11-19T19:45:15+5:30
धान्याची २५ कोटींची उलाढाल राहणार ठप्प
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी संपला. बुधवारी (दि.२०) मतदान आहे. या दिवशी जिल्ह्यातील ८ कृषी उत्पन्न बाजार समित्या व १४ आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. धान्य ते कटलरीपर्यंत सुमारे २५ कोटींची उलाढाल यानिमित्ताने ठप्प होईल.
लोकशाहीत मतदान करण्याचा हक्क सर्वांना दिला आहे. १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनापासून ते राजकीय पक्षांपर्यंत सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मतदानापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे आता ‘मतदान केंद्रात’ रुपांतर झाले आहे. तर आठवडी बाजारामुळे मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून बुधवारी भरणारे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
८ बाजार समित्यांची इमारत निवडणूक आयोगाच्या ताब्यात
जिल्ह्यात जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचा ताबा निवडणूक आयोग मंगळवारी सकाळपासून घेणार आहे. इमारतीसमोर मंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय पैठण, फुलंब्री, गंगापूर, कन्नड, लासूर स्टेशन, सिल्लोड, वैजापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीतही मतदान केंद्र असल्याने बुधवारी बंद राहणार आहे.
जिल्ह्यात आहेत ९२ आठवडी बाजार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९२ आठवडी बाजार भरतात. प्रत्येक लहान-मोठ्या आठवडी बाजारात ५० लाख ते १ कोटीपर्यंतची उलाढाल होते.
मतदानाच्या दिवशी कोणते आठवडी बाजार राहणार बंद
तालुका----- गावाचे नाव
१) छत्रपती संभाजीनगर : लाडसावंगी, चित्तेपिंपळगाव, आडगाव सरक.
२) गंगापूर : लिंबजळगाव.
३) कन्नड : चापानेर, नागापूर.
४) पैठण : बिडकीन, दावरवाडी.
५) सिल्लोेड : शिवणा, आमठाणा.
६) फुलंब्री : बाबरा.
७) वैजापूर : लोणी खु., परसोडा
८) खुलताबाद : खुलताबाद
कोणत्या तालुक्यात किती आठवडी बाजार ?
१) छत्रपती संभाजीनगर शहर, तालुका : १२
२) गंगापूर : ८
३) कन्नड : १५
४) पैठण : १३
५) सिल्लोड : १३
६) फुलंब्री : ९
७) वैजापूर : ११
८) सोयगाव : ५
९) खुलताबाद : ६