घाटीला आठ कोटी ४२ लाख रुपयांची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:05 AM2021-01-02T04:05:22+5:302021-01-02T04:05:22+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुधारित आठ कोटी ४२ लाख ...
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुधारित आठ कोटी ४२ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी १२ कोटी ५७ लाख रुपये मंजूर होते; मात्र काेरोना उपाययोजनांसाठी घाटी निधीतून चार कोटी १५ लाख रुपयांची कात्री लावण्यात आल्याने आता आठ कोटी ४२ लाख रुपयांचे नियोजनाचा प्रस्ताव घाटीकडून सादर करणासाठी तयारी सुरू आहे.
नव्या सिटी स्कॅन यंत्राची मागणी
औरंगाबाद : जिल्हा वार्षिक योजनेतून घाटीकडून जुने ६ स्लाइस सिटी स्कॅन यंत्र देऊन नवे १६ स्लाइस सिटी स्कॅन यंत्र, अनेस्थेशिया वर्क स्टेशन आणि सोनोग्राफी यंत्रांसह विविध यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. घाटीत नुकतेच १२८ स्लाइस हे अत्याधुनिक सिटी स्कॅन यंत्र मिळाले आहे, तर दुसरे यंत्रही कालबाह्य झाल्याने तेही बदलण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या
प्रवेशद्वारावर तपासणी पथक
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाकडून ॲण्टिजेन टेस्ट व थर्मल गन, ऑक्सिमीटर तपासणीसाठी पथक तैनात करण्यात आले आहे. येणाऱ्या अभ्यागतांची ऐच्छिक तपासणी या पथकाकडून करण्यात येत आहे.
घाटीत वाढदिवसाची पोस्टरबाजी
औरंगाबाद : घाटीत राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जागोजागी शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. एकीकडे घाटीत नवे रस्ते, रंगरगोटी होत असताना तर दिवसेंदिवस पोस्टरने विद्रूपीकरण करणाऱ्यांची संख्या वाढल्याने परिसरात राजकीय पोस्टरबाजीला घाटीतून हद्दपार करण्याची मागणी होत आहे.
आंदोलनाचा ५१वा दिवस
औरंगाबाद : घाटीत जानेवारी व फेब्रुवारी २०२०चे पैसे मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ५१ दिवस उलटले आहेत. अद्याप यावर तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच असल्याने प्रशासनाने आंदोलकांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करण्याकडे लक्ष देण्याची मागणी महिला आंदोलकांकडून होत आहे.
कोतवालपुऱ्यात रस्त्यामध्ये जीवघेणा खड्डा
औरंगाबाद : कोतवालपुऱ्यातून पोलीस आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध जीवघेणा खड्डा पडला आहे. नागरिकांना खड्ड दिसावा यासाठी त्यात नारळाच्या फांद्या रोवल्या आहेत. मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याने मनपाने या खड्ड्यांवर ढापे टाकण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.