८ लाख नागरिकांना मिळणार लस; ३ लाख नागरिकांचे झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 02:40 PM2021-04-22T14:40:59+5:302021-04-22T14:42:33+5:30
लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसरा लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाने आता १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ८ लाख तरुणांना लस मिळेल. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहीम राबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे, तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचे प्राण वाचविणे हेच सर्वात मोठे ध्येय आरोग्य यंत्रणेसमोर आहे. दुसरीकडे शासनाकडून लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी निर्देश देण्यात येत आहेत. केंद्र राज्य शासनाला पाहिजे तसा लसीचा साठा उपलब्ध करून देत नाही. शहर आणि ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या लसींवर आरोग्य यंत्रणेला मोहीम राबवावी लागत आहे. दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आरोग्य यंत्रणेला लढावे लागत आहे.
तुटपुंज्या स्वरूपाचा साठा उपलब्ध
महापालिकेकडे मंगळवारी दुपारी लसीचा साठा संपला. ग्रामीण भागात फक्त ६ हजार लसींचा साठा शिल्लक होता. मंगळवारी मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्यासाठी ४८ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरासाठी फक्त १५ हजार लस देण्यात आल्या आहेत. शहरात या लस अडीच दिवस पुरतील. केंद्र आणि राज्य शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध करून दिल्या जात नाही.
ज्येष्ठ नागरिकांचा कमी प्रतिसाद
लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, आरोग्य कर्मचारी यांच्यासोबतच ज्येष्ठांनाही लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात ३ लाख लस देण्यात आल्या. त्यातील फक्त एक लाख लस ज्येष्ठ नागरिकांनी घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद अद्यापपर्यंत योजनेला मिळालेला नाही.
४५ पेक्षा जास्त वयाचे लसीकरण
केंद्र शासनाने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला. मात्र मागील २ महिन्यात एक लाख तीन हजार नागरिकांनी लस घेतली. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार प्रयत्न करीत आहे.
दुसऱ्या डोसचे काय?
फ्रंटलाइन वर्कर, हेल्थ वर्कर, ज्येष्ठ नागरिक, ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार दुसऱ्या टप्प्यात डोस देण्यात येत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी काही नागरिक कंटाळा करीत आहेत. चार आठवडे उलटल्यानंतरही स्वतःहून डोस घेण्यासाठी येत नाहीत. महापालिका प्रशासन आरोग्य यंत्रणेकडून दुसऱ्या डोसची आठवण देण्यात येते. लसींच्या डोस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे.
लसीकरण केंद्र वाढवावे लागणार
केंद्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गर्दी टाळण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य यंत्रणेला लसीकरण केंद्र वाढवावे लागणार आहेत. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कर्मचारी आणावेत कोठून असा प्रश्न पडला आहे.
१८,८६,२८४ -मतदार जिल्ह्यातील
८,००,००० -१८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या
९,९२,८५३ - पुरुष मतदार
८,८२,२५८ - महिला मतदार