बदनामीची धमकी देत अभियंत्याला मागितली ८ लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 05:57 PM2019-07-22T17:57:42+5:302019-07-22T18:00:37+5:30
माहिती अधिकारात माहिती घेऊन रचला डाव
औरंगाबाद : माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवून महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याला बदनामीची धमकी देऊन ८ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या त्रिकुटाला सिडको पोलिसांनी सापळा रचून खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई सिडको एन-५ मधील मैदानावर रविवारी दुपारी करण्यात आली.
उदय अरुणराव पालकर (४६, श्रीयोग अपार्टमेंट, सिडको एन-५), भानुदास शंकर मोरे (३१, रा. जयभवानीनगर) आणि अमोल सांडू साळवे (३५, रा. गुलमोहर कॉलनी, सिडको) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी उदय पालकरने माहिती अधिकार कायद्यांतर्गत महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची वैयक्तिक आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती मागितली होती. त्यानुसार त्याला सर्व माहिती कार्यालयातर्फे पुरविण्यात आली. १९ जुलै रोजी गणेशकर हे त्यांच्या कार्यालयात बसलेले असताना आरोपी उदय पालकर त्यांना जाऊन भेटला आणि म्हणाला की, तुमची आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती मागवून तुम्हाला फरक पडत नाही. ‘आमचे काय चुकले,’ असे गणेशकर यांनी त्यास विचारले असता तो म्हणाला की, मला तुमच्यासोबत कामाचे बोलायचे आहे; पण तुमच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला. गणेशकर यांनी बाहेर येण्यास असमर्थता दर्शविली आणि कार्यालयातील लिपिक विनोद श्याम सोनवणे यांच्यासोबत बोला, असे सांगून सोनवणे यांना त्याच्यासोबत पाठविले.
सोनवणे यांना तो सिडको नाट्यगृहाच्या रस्त्यावर घेऊन गेला. तेथे उदयचा एक मित्र थांबलेला होता. त्या दोघांनी सोनवणे यांना सांगितले की, गणेशकर आणि तुमच्या कार्यालयातील माहिती मागविली आहे. तुम्ही २० जुलै रोजी दुपारी ४ वाजता ८ लाख रुपये रोख आणून दिल्यास आम्ही तुमची बदनामी करणार नाही. शिवाय ही रक्कम तुम्हीच आणून द्यावी, अशी अटही त्यांनी सोनवणे यांना घातली. सोनवणे यांनी आरोपीसोबत झालेल्या संवादाची माहिती गणेशकर यांना दिली. गणेशकर यांनी सिडको पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब अहेर, कर्मचारी नरसिंग पवार, राजेश बनकर, डोंगरे, सुरेश भिसे, गाढे, रत्नपारखी यांनी पंचासमक्ष सिडकोतील एका हॉटेलसमोरील मनपाच्या मैदानात सोनवणे यांच्यासोबत पंच पाठवून खंडणीची रक्कम पाठविली. आरोपी उदय आणि त्याचे साथीदार भानुदास मोरे, अमोल साळवे यांच्यासह तेथे आले. सोनवणे यांच्याकडून खंडणीची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी आरोपींना पकडले.