पर्यटनासाठी सिक्कीमला गेलेल्या सिल्लोडच्या दोन कुटुंबातील ८ सदस्यांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:14 PM2023-10-07T17:14:51+5:302023-10-07T17:16:07+5:30
पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कोणाचाही संपर्क झाला नसल्याचे सिक्कीम प्रशासनाने कळवले आहे
सिल्लोड: सिक्कीम मध्ये अतिवृष्टी झाल्याने तिस्ता नदीच्या खोऱ्यात महापूर आला आहे.यामुळे पर्यटनासाठी गेलेले सिल्लोड शहरातील दोन कुटुंबातील ८ लोकांशी संपर्क तुटला आहे. कुटुंबाच्या विनंतीवरून अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, खासदार रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकार व तेथील कमिशनर यांच्याशी संपर्क साधला. मात्र तेथील पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कुणाशी संपर्क झाला नसल्याचे प्रशासनाने कळवले आहे.
नंदकिशोर सहारे यांचे पुतणे कुणाल सुरेश सहारे (३९) त्यांची पत्नी राजश्री (३८) मुलगा सर्वांष (११), मुलगी साईशा ( दीड वर्ष) आणि शहरातील स्नेहेश कांतीलाल जैन (ओस्तवाल) (३९) त्यांची पत्नी शितल (३६) मुलगी मोक्षा (१२),मुलगा सिद्धांत (९) हे सर्व सिल्लोड येथून २९ सप्टेंबर रोजी दार्जिलिंग, सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेले. ते सिक्कीम मधील हॉटेल यशश्री लचुंगमध्ये थांबले होते. २ ऑक्टोबर पर्यंत त्यांचा येथील नातेवाईकांसोबत संपर्क झाला. सिक्कीम येथे महापूर आल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी त्यांनी मेसेज करून आम्ही हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याचे कळवले. मात्र, तेव्हापासून दोन्ही कुटुंबाचा संपर्क होऊ शकला नाही.
घाबरलेल्या नंदकिशोर सहारे यांनी तात्काळ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार व खासदार रावसाहेब दानवे यांना संपर्क साधून मदतीची विनंती केली. मंत्री सत्तार यांनी लागलीच सिक्कीम सरकारला अडकलेल्या आठही जणांचा शोध घेण्याचे पत्र दिले. दरम्यान, तेथील कमिशन यांच्याशी मंत्री सत्तार यांचे बोलणे झाले असून त्यांनी पूरस्थितीमुळे अनेकांचे संपर्क तुटले असून मदत कार्य सुरू असल्याची माहिती दिली.