कुलगुरू होण्यासाठी विद्यापीठातील ८ जण इच्छुक; आतापर्यंत ७८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज

By राम शिनगारे | Published: October 26, 2023 12:24 PM2023-10-26T12:24:57+5:302023-10-26T12:25:49+5:30

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे.

8 people from the Dr.BAMU university are willing to become the Vice-Chancellor; So far 78 candidates have applied online | कुलगुरू होण्यासाठी विद्यापीठातील ८ जण इच्छुक; आतापर्यंत ७८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज

कुलगुरू होण्यासाठी विद्यापीठातील ८ जण इच्छुक; आतापर्यंत ७८ उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू होण्यासाठी ७८ जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात विद्यापीठाच्या विविध विभागांमधील आठ जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. १६ जुलै २०१९ रोजी त्यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली होती. मुदत पूर्ण होत असल्यामुळे नवीन कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी नेमलेल्या शोध समितीने पात्र उमेदवारांकडून २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यात ७८ जणांनी ऑनलाइन अर्ज केले असून, २७ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना हार्डकॉपी समितीकडे सादर करता येणार आहे. कुलगुरू शोध समितीच्या अध्यक्षपदी एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आहेत. त्याशिवाय भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.जी. सुरेश आणि श्रीनगर येथील एनआयटीचे संचालक डॉ. सुधाकर एडला हे सदस्य असून, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी समितीचे सदस्य सचिव आहेत. नोडल ऑफिसर म्हणून श्रीनगर एनआयटीचे प्राध्यापक डॉ. जानिबुल बशीर आहेत.

विद्यापीठातील आठ जणांचा समावेश

कुलगुरूपदाचा अर्ज करण्यासाठी प्रशासनाकडून विद्यापीठातील आठ जणांनी परवानगी घेतली आहे. त्यात अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, वनस्पतीशास्त्राचे डॉ. अरविंद धाबे, परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी, रसायनशास्त्राचे डॉ. सुरेश गायकवाड, पर्यावरणाचे डॉ. सतीश पाटील, डॉ. एम.बी. मुळे, जीवरसायनच्या डॉ. वंदना हिवराळे, प्राणिशास्त्राचे डॉ. मार्टिन रेमंड यांचा समावेश आहे. त्याशिवाय विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील माजी प्रकुलगुरू तथा देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, कोहिनूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, देवगिरीचे उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, उमरगा येथील छत्रपती महाविद्यालयातील डॉ. धनंजय माने यांनीही अर्ज केल्याची माहिती आहे. यामध्ये पर्यावरणाचे डॉ. सतीश पाटील यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे.

निकषांमुळे अनेकांची संधी हुकली
कुलगुरूपदासाठी १० वर्षे प्रोफेसर आणि पाच वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव अनिवार्य आहे. त्यात महाविद्यालयातील प्राचार्यांचा प्रशासकीय अनुभव ग्राह्य असून, विभागाच्या प्रमुखाचा अनुभव ग्राह्य नाही. विशेष म्हणजे, विद्यापीठातील विभागप्रमुख हा प्रशासकीय अनुभव ग्राह्य धरलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयातील अनेकांची अर्ज करण्याचीच संधी हिरावण्यात आली आहे.

 

Web Title: 8 people from the Dr.BAMU university are willing to become the Vice-Chancellor; So far 78 candidates have applied online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.