बजाजनगरात निर्बंधांचे उल्लंघन करणारी ८ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:02 AM2021-05-22T04:02:22+5:302021-05-22T04:02:22+5:30
: महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई : कारवाईची माहिती कळताच इतर दुकाने तत्काळ बंद वाळूज महानगर : कोरोना ...
: महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
: कारवाईची माहिती कळताच इतर दुकाने तत्काळ बंद
वाळूज महानगर : कोरोना निर्बंध काळात दुकाने सुरू ठेवून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. बजाजनगरात शुक्रवारी सकाळी ११ वाजेनंतर महसूल व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवित ८ दुकाने सील केली.
कोरोनाच्या संसर्गामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास बंदी आहे. मात्र, बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, जोगेश्वरी, सिडको वाळूज महानगर आदी ठिकाणी जवळपास सर्वच दुकाने सुरू असल्याने लॉकडाऊनचा फज्जा उडत आहे. बजाजनगर परिसरात शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, अप्पर तहसीलदार रतनसिंग साळोक, गटविकास अधिकारी प्रकाश शिरसाट, दीपक बागुल, गणेश धनवई, तलाठी पूनमसिंग राजपूत, भगवान पवार, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, वाहतूक शाखेचे निरीक्षक जनार्धन साळुंके आदींच्या उपस्थितीत कारवाईला सुरुवात करण्यात आली.
या कारवाईत शैलेश तळेकर यांचे नृसिंह युनिफाॅर्म व सुटिंग सेंटर, कुणाल साबू यांचे समर्थ कॉम्प्युटर, मोहटादेवी चौकातील रूपाली सुसर यांचे ओम कलेक्शन, भगत यांचे तिरुमला साडी सेंटर, महावीर धुमाळे यांचे महावीर ज्वेलर्स, महावीर चौकातील आनंद इलेक्ट्रिकल्स, सुमन बोले यांचे एस. एस. ट्रेडिंग, विपुल पटेल यांचे आनंद इलेक्ट्रिकल्स व संतोष धोकट यांचे चिंतामणी अल्युमिनियम अॅण्ड ग्लास आदी ८ दुकाने सील करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण यांनी सांगितले.
माहिती मिळताच बाजारपेठा ओस
कारवाईसाठी महसूल व पोलीस प्रशासनाचा ताफा वाहनांसह प्रमुख चौकात येताच अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. या मोहिमेत नियोजनाचा अभाव असल्याने व्यापाऱ्यांनी संधी साधत दुकाने बंद केल्याने मोहिमेचा म्हणावा तसा परिणाम जाणवला नाही.
फोटो ओळ
बजाजनगर परिसरात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांना सील लावताना उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार रतनसिंग साळोक, पो.नि. प्रशांत पोतदार आदी.