औरंगाबाद जिल्ह्यात एसटी करणार ८ हजार वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:17 PM2018-06-05T15:17:40+5:302018-06-05T15:20:04+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक आगार आणि बसस्थानक परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील प्रत्येक आगार आणि बसस्थानक परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात येणार आहे. उद्दिष्ट ५ हजार ८०० दिले असले तरी ८ हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी आगार प्रमुख वा बसस्थानक व्यवस्थापकांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यभर ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी विविध प्रशासकीय विभागांसह स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्हा आणि विभागनिहाय वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला ६ हजार ८०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. औरंगाबाद विभागांतर्गत ८ आगार येतात. या आगारांसह प्रमुख बसस्थानक व छोट्या मोठ्या बसस्थानकांवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक आगाराला एक हजार वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे उद्दिष्ट विभागामार्फत देण्यात आले आहे. या आगारांतर्गत येणारे बसस्थानक व छोटे मोठे स्थानक येथे वृक्ष लागवड करण्याचे आदेश आगार प्रमुखांना देण्यात आले आहेत.
यादृष्टीने आगार प्रमुखांना नियोजन करण्यास सांगण्यात आले असून, दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्ष लागवड करण्याची संस्कृती मोडीत काढून या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार केवळ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले नाही. लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन केले जाणार आहे.
आगारात उद्यानाची संकल्पना आहे
लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धन करण्यासह ज्या आगारात जागा उपलब्ध असेल तेथे उद्यानाची संकल्पना आहे. यातून केवळ जनजागृतीच नव्हे तर पर्यावरण संवर्धनही होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात आयएसओ ९००२ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. याचे निकष पूर्ण करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे.
- प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, औरंगाबाद.