खरीप हंगामाच्या ८० टक्के पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:04 AM2021-07-12T04:04:17+5:302021-07-12T04:04:17+5:30
कृषी विभाग : दुबार पेरणीत बियाणे उगवणीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता --- औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामात ८०.६१ टक्के खरिपातील ...
कृषी विभाग : दुबार पेरणीत बियाणे उगवणीच्या तक्रारी वाढण्याची शक्यता
---
औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामात ८०.६१ टक्के खरिपातील पेरण्या झाल्या. अद्याप जिल्ह्यातील उगवणीसंदर्भातील तक्रारी दोन अंकीसुद्धा नाहीत. मात्र, पावसाच्या दिलेल्या उघडीपमुळे अनेकांसमोर दुपार पेरणीचे संकट ओढावले आहे. दुबार पेरणीत वापरलेले बियाणे उगवणीत समस्या जास्त निर्माण होऊ शकते, अशी शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात ७ जुलैपर्यंत खरिपाच्या ६ लाख ७५ हजार सरासरी क्षेत्रापैकी ५ लाख ४४ हजार २५६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. त्यात ३ लाख ९ हजार हेक्टर कापूस, १८ हजार ४३९ हेक्टर सोयाबीन सरासरीच्या क्षेत्राच्या तुलनेत १३६ टक्के लागवड झाली. तुरीचे क्षेत्रही वाढले असून, ३२ हजार ९६३ हेक्टर म्हणजेच १०३ टक्के लागवड झाली. खरीप ज्वारी ४४१ हेक्टर, बाजरी १५ हजार ८०९ हेक्टर, मका १ लाख ४१ हजार ७०१ हेक्टर, तर ४६२५ हेक्टर इतर तृणधान्याची पेरणी पूर्ण झाली आहे. तुलनेत जालना जिल्ह्यात ९८.४० टक्के, तर बीड जिल्ह्यात ९०.५० टक्के पेरणी झाली असून, औरंगाबाद विभागात ८६.५८ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.