जायकवाडी धरणात ८० टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:59 AM2017-09-02T00:59:03+5:302017-09-02T00:59:03+5:30
जायकवाडी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी ८० टक्के झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : जायकवाडी धरणाची पाणीपातळी शुक्रवारी ८० टक्के झाली असून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तेथील धरण समुहातून होणारे विसर्ग आज घटवून नाममात्र ठेवण्यात आले. यामुळे जायकवाडी धरणात येणारी आवक घटली आहे. उद्या, शनिवारी दुपारनंतर जायकवाडीत नाममात्र आवक येण्याची शक्यता धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
धरणात ८० टक्के जलसाठा झाल्यानंतर आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. याबाबत प्रशासनाकडून पैठण ते नांदेड गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याची प्रथा असून लवकरच प्रशासनाकडून असा इशारा देण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सायंकाळी धरणात १५३५० क्युसेक्स अशी आवक सुरू होती. धरण भरण्यासाठी आता केवळ फक्त ४ फूट पाणी हवे आहे.
१५२२ फूट जलसंचय क्षमता असलेल्या धरणाची शुक्रवारी सायंकाळी पाणीपातळी १५१८ फुटापर्यंत गेली होती. यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ चार फूट पाणी लागणार आहे.