८० वर्षांची आजी रिकामी घागर घेऊन मोर्चात, मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही भेटावे, फडणवीसांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:02 PM2022-05-24T12:02:46+5:302022-05-24T12:03:17+5:30
महाविकास आघाडी सरकारने पाणी योजनांचा बट्ट्याबोळ केल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांची टीका; औरंगाबादेत भाजपचा जलआक्रोश मोर्चा
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने पाण्याच्या योजनांचा मुडदा पाडला. वैधानिक विकास मंडळ संपविले. मराठवाडा वॉटर ग्रीडची माती केली. दमणगंगेचे पाणी विभागाकडे येणाऱ्या योजनांचा अध्यादेश आमच्या सरकारच्या काळात झाला; परंतु, पुढे या सरकारने काही केले नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केला. तसेच मुंबईतील फायर आजींच्या घरी जाऊन मुख्यमंत्री भेटले. मग, आज मोर्चात ८० वर्षे असलेल्या आजी रिकामी घागर घेऊन सहभागी झाल्या. या आजींच्या घरीही भेट द्यावी, असे आव्हान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
फडणवीस यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडकलेल्या जलआक्रोश मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले. महापालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप करत १६८० कोटी रुपयांची शहर पाणीपुरवठा योजना महाविकास आघाडी सरकारच्या वाटाघाटींमुळे पुढील २५ वर्षेदेखील पूर्ण होणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. भाजपने २०१३ नंतर प्रथमच स्वबळावर मोर्चा काढून शिवसेनेच्या गडात धुरळा उडविला. पैठण गेटपासून महापालिकेपर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. गिरीश महाजन, आ. अतुल सावे यांच्यासह हजारो नागरिकांचा सहभाग होता.
पहिल्यांदाच भाजपचा महापालिकेवर मोर्चा
शिवसेनेसोबत ३० वर्षांचा सत्तेच्या वाटाघाटी २०१९ मध्ये फिसकटल्या. दोन वर्षांपासून शिवसेना आणि भाजपत महापालिकेच्या राजकारणावरून कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असून सोमवारी भाजपाने शिवसेनेच्या गडात पूर्ण ताकदीने धुराळा उडवित जोरदार जलआक्रोश मोर्चा काढला. यापूर्वी विभागीय पातळीवरून गर्दी करण्याचे नियोजन केले जात असे, परंतु यावेळी शहरातील संघटनेवरच मोर्चा काढून भाजपाने स्वबळ आजमावले. २०१३ साली भाजपने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. त्यानंतर ९ वर्षांनी भाजपाने मनपातील सत्ता परिवर्तनासाठी मोर्चातून रणशिंग फुंकले.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांचे नियोजन
मोर्चासाठी पूर्ण ताकद केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लावली. गेल्या आठवडाभर ते मोर्चाच्या नियोजनासाठी शहरात होते. तसेच काही वॉर्डांमध्ये जाऊन त्यांनी बैठका घेत पाणीपुरवठ्याची समस्या जाणून घेतली. नागरिकांनी मोर्चात येण्याचे आवाहनही त्यांनी केले. निमित्ताने भाजपला साम, दाम, दंड, भेद या नीतीने मैदानात उतरण्याची संधी मिळाली.