भाजी विक्रेता महिलेच्या चिमुकलीसोबत ८० वर्षीय वृद्धाचे अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:56 PM2024-09-28T17:56:51+5:302024-09-28T17:59:39+5:30
८० वर्षीय वृध्दाचे चिमुकलीसोबत अश्लिल चाळे; सतर्क महिलेमुळे अनर्थ टळला, पोलिसांनी आरोपी वृद्धास ताब्यात घेतले आहे
वाळूज महानगर: आजोबासमान एका ८० वर्षीय वृध्द इसमाने एका अडीच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२७) उद्योगनगरीत घडली. यावेळी एका सतर्क महिलेने हा घृणास्पद प्रकार पाहून त्याचे चित्रीकरण करत पुरावा तयार केल्याने ही गंभीर घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी रामलाल धोंडीबा कुकलारे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
वाळूजमहानगरात वास्तव्यास असणारी पिडीता मधू (२.५ वर्ष, नाव बदलले आहे) या चिमकुलीचे वडील उद्योगनगरीत एका कंपनीत काम करतात तर तिची आई भाजीपाला विक्री करुन कुटुंबास हातभार लावते. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मधूला सोबत घेऊन तिची आई भाजीपाला विक्री करण्यासाठी आपल्या दुकानात गेली होती. भाजीपाला विक्री करत असताना मधू समोरच्या ओट्यावर खेळत होती. तेथे एक वृध्द इसम हा अगोदरच बसलेला. त्याने कोणी पाहत नसल्याची खात्री करत मधूला मांडीवर बसवत तिच्यासोबत अश्लील चाळे करु लागला. हा प्रकार शेजारील महिलेच्या निदर्शनास आला. तीने लागलीच या घृणास्पद प्रकारचे चित्रीकरण करत मधूच्या आईला दाखवले.
घाबरलेल्या आईने मधूला त्या वृद्धाजवळून उचलून घेतले. या प्रकाराची माहिती कंपनीतील मधूच्या वडिलांना दिली. काही वेळाने पती-पत्नीने आपल्या काळजाचा तुकडा मधूला सोबत घेऊन पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना घडलेला प्रकार सांगत मोबाईलमधील चित्रीकरण दाखवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रामलाल धोंडीबा कुकलारे (८०) याच्याविरुध्द वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज शनिवारी सकाळी आरोपी रामलाल कुकलारे याला पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करीत आहेत.