८०० ग्राहकांना ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:09 AM2017-07-18T01:09:21+5:302017-07-18T01:13:59+5:30
औरंगाबाद : सहा महिन्यांपासून दरमहा ० ते १०० युनिट वीज वापर असलेले शहरातील ८०० ग्राहक वीज चोरीच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सहा महिन्यांपासून दरमहा ० ते १०० युनिट वीज वापर असलेले शहरातील ८०० ग्राहक वीज चोरीच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या ग्राहकांची यादीच महावितरणने पोलिसांना दिली असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. प्रतिदिन ५० ग्राहकांना गुन्हेशाखेत बोलावून त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
दोन दिवसांपूर्वी वीज चोरीचे चिनी बनावटीचे रिमोट विक्री करणारा मास्टरमाइंड किशोर राईकवार या इलेक्ट्रिशियनसह पोलिसांनी सहा वीज ग्राहकांना अटक केली. शिवाय २२ ग्राहकांविरुद्ध वीजचोरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी हर्सूल, सिडको आणि जिन्सी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविले. शहरातील अन्य संशयित वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी सुरू असून वीज चोरीची आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आणि कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे.
पोलीस आयुक्त याविषयी म्हणाले की, महावितरणने वीज चोरीचा संशय असलेल्या ८०० ग्राहकांचा डाटा पोलिसांना दिला आहे. यात घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश आहे. शिवाय दरमहा ० युनिट रीडिंग असणे, ० ते ३० युनिट रीडिंग आणि ३० ते १०० युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांची ही माहिती आहे. दरमहा एकसारखाच वीज वापर कसा काय असू शकतो, असा प्रश्न महावितरण आणि पोलिसांना पडला आहे. महावितरणने वीज वापराच्या टप्प्यानुसार दर ठरविलेले आहे. ३० युनिट आणि ३० ते १०० युनिट आणि १०० ते ३०० युनिट आणि त्यापेक्षा अधिक वीज वापरणारे ग्राहक असे टप्पे आहेत. प्राथमिक तपासात घराबरोबरच, कार्यालये, शाळा अशा ठिकाणचे वीज मीटरदेखील रिमोट अथवा फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे दिसते आहे.